Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यात या तालुंक्यातील १०९ गावांचा दुष्काळ हटणार; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:04 IST

Tembhu Yojana सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकणाऱ्या टेंभू योजनेच्या विस्तारित सहाव्या टप्प्याला गतवर्षी सुरुवात झाली.

हणमंत पाटीलसातारा : सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकणाऱ्या टेंभू योजनेच्या विस्तारित सहाव्या टप्प्याला गतवर्षी सुरुवात झाली.

पहिल्या पाच टप्प्यांतील सहा तालुक्यांसह नव्याने माण, खटाव व जत या तीन तालुक्यांतील १०९ वंचित गावांचा समावेश विस्तारित योजनेत केला आहे.

त्यामुळे ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या लाभक्षेत्रात येणार आहे. त्यासाठी ७ हजार ३७० कोटींच्या सुधारित प्रकल्प अहवालाला १ मे २०२४ रोजी मंजुरी देण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांच्या पूर्व भागातील म्हणजे अवर्षणप्रवण माणदेशातील नऊ तालुक्यांच्या पाचवीला दुष्काळ पूजलेला होता. त्यामुळे या भागातून पुणे, मुंबईला नोकरीसाठी आणि देशभर गलाई व्यवसायानिमित्ताने स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले.

मात्र, गेल्या ३० वर्षांत टेंभू योजनेच्या पाच टप्प्यांच्या अंमलबजावणीला यश आले. मात्र, या पाचही टप्प्यांत काही डोंगर व उतारावरील गावे वंचित राहिली होती. त्यामध्ये सर्वाधिक ३३ गावे खानापूर आणि १४ गावे आटपाडी तालुक्यातील होती.

त्यामुळे खानापूर-आटपाडीचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी वंचित गावांचा टेंभू विस्तारित योजनेत समावेश करण्यासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारित सहाव्या टप्प्याला त्यांचे नाव देण्याचा अध्यादेश काढले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुळेवाडी रस्ता, विटा (जि. सांगली) येथे सहाव्या टप्प्याचे काम सुरू झाले. साधारण चार वर्षांत म्हणजे २०२८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे, असे सांगलीतील टेंभू प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

‘टेंभूनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावानी’टेंभूच्या पहिल्या पाच टप्प्यांत तीन जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यांतील २१० गावांतील ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले जात आहे. विस्तारित सहाव्या टप्प्यांत आणखी तीन म्हणजे माण, खटाव व जत या दुष्काळी तालुक्यांचा समावेश झाला. त्यामुळे वंचित १०९ गावांतील ४१ हेक्टर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सर्व सहा टप्प्यांच्या पूर्णत्वानंतर एकूण एक लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन दुष्काळाचा कलंक मिटणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागात आता ‘टेंभूनं आणलं पाणी अन् शेतं पिकली सोन्यावानी’ असा सूर आवळला जातोय.

विस्तारित योजनेतील वंचित गावे१) खानापूर : ३३२) आटपाडी : १४३) तासगाव : २५४) कवठेमहांकाळ : १७५) जत : ४६) कडेगाव : १७) सांगोला : १२८) माण : २०९) खटाव : ३३

टेंभूच्या विस्तारित योजनेचे पाच टप्पे१) खानापूर-तासगाव कालवा (२६ किमी)२) पळसी उपसा सिंचन योजना.३) कवठेमहांकाळ कालवा (१७ किमी)४) घानंद तलाव कालवा (६ किमी)५) आटपाडीतील कामथ तलावावरून गुरुत्व नलिका.

टेंभू योजनेतील वंचित गावांना अतिरिक्त पाण्याच्या मागणीसाठी स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्यासह तासगाव-कवठेमहांकाळ, माण-खटाव, कडेगाव व जत तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेंभूच्या विस्तारित योजनेसाठी अतिरिक्त ८ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वंचित गावांतील दुष्काळ हटणार आहे. - ॲड. बाबासाहेब मुळीक, सदस्य, जलव्यवस्थापन समिती, सांगली

अधिक वाचा: टेंभू योजना तर सुरु झाली.. पण समन्यायी पाणी वाटप कसे होणार? वाचा सविस्तर

टॅग्स :टेंभू धरणपाटबंधारे प्रकल्पपाणीमहाराष्ट्रदुष्काळसांगलीशेतकरीशेतीपीकसोलापूर