देशभरात २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो. हा दिवस हवामान बदलाचे गंभीर परिणाम अधोरेखित करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सांगतो.
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत.
हवामान बदल हा मुख्यतः मानवी क्रियाकलापांमुळे निर्माण झालेले संकट आहे. त्यात वाहनांचा धूर, जंगलतोड, कारखान्यांचे प्रदूषण, युद्ध, बेकायदेशीर उत्खनन, शहरीकरण, प्लास्टिकचा अतिवापर आणि शेतीतील अस्वच्छता यासारखी कारणे समाविष्ट आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत जागतिक तापमान १.५°C ने वाढेल, ज्यामुळे हवामान बदलाचे संकट आणखी गंभीर होईल. मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण आणि पाणीटंचाई ही समस्या वाढत आहेत, परंतु योग्य प्रयत्नांनी परिस्थिती सुधारता येऊ शकते.
हवामान व जलवायू
हवामान म्हणजे अल्पकालीन वातावरणीय स्थिती, तर जलवायू म्हणजे दीर्घकालीन सरासरी परिस्थिती. हवामानातील बदल तापमान, वारा, आर्द्रता, पर्जन्य, थंडी, सूर्यप्रकाश, वायुदाब यांसारख्या घटकांवर अवलंबून असतात. या घटकांचा समतोल संपल्यास पर्यावरण व शेती प्रभावित होतात.
तापमान हे सर्वात महत्त्वाचे घटक आहे. वाढलेल्या तापमानामुळे पिकांमध्ये उष्णतेचा ताण वाढतो, फुलधारणा व फळधारणा प्रभावित होते, आणि प्रकाशसंश्लेषण कमी होऊन उत्पादन घटते.
विशेषतः द्राक्ष, संत्रा, ऊस, भाजीपाला आणि नगदी पिकांवर परिणाम होतो. तापमान वाढल्याने नदी, तलाव आणि कॅनॉलमधील पाण्याची पातळी कमी होते, तसेच सागरी इकोसिस्टम देखील धोक्यात येते.
वारा शेतावर दोन्ही प्रकारे परिणाम करतो. जोरदार वाऱ्यामुळे फळधारणा कमी होऊ शकते, मातीची धूप होते आणि आर्थिक नुकसान होते; मात्र सौम्य वारा परागीकरणास मदत करतो.
आर्द्रता पिकांच्या आरोग्यावर परिणाम करते. जास्त आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोग वाढतात, तर कमी आर्द्रतेमुळे पिके कोरडी पडतात. संतुलित आर्द्रता आवश्यक आहे, विशेषतः फळपिकांसाठी.
थंडी पिकांची वाढ मंदावते, फुलधारणा कमी होते, आणि काही वेळा फळांचे नुकसान होते. भाजीपाला आणि फळपिकांमध्ये थंडीचा प्रभाव विशेष दिसतो.
पाऊस शेतीसाठी जीवनदायी आहे, परंतु त्यातील अनियमितता ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते, तर दुष्काळामुळे उत्पादन घटते. त्यामुळे जलव्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते.
हवामान बदलाचा शेतकरी वर्गावर परिणाम
हवामानातील बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. उत्पादनातील अनिश्चितता, सिंचन खर्चात वाढ, किड-रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यातील आर्थिक नुकसान हे शेतकऱ्यांना थेट प्रभावित करतात.
शाश्वत आणि आधुनिक शेती उपाय
हवामान बदलावर मात करण्यासाठी शाश्वत शेती व आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे. यामध्ये:
प्रत्येक महसूल मंडळात आधुनिक कृषी हवामान केंद्रे स्थापन करणे
शेतकर्यांना हवामान माहिती मोबाईलवर उपलब्ध करणे
संरक्षित शेती, शेड नेट शेती, पोलिहाऊस, थेंब थेंब सिंचन, ठिबक सिंचन, ऑटोमेशन, फर्टिगेशन, क्रॉप कुलिंग, क्रॉप कव्हर, मल्चिंग यांचा वापर करणे
जैविक कीड व बुरशी नाशके, मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करणे
या उपायांमुळे पाण्याची बचत होते, उत्पादनात १–१.५ पट वाढ होते आणि तापमानामुळे पिकांना होणारा ताण कमी होतो.
एकंदरीत हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या योजना (प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पीक विमा योजना), वृक्षारोपण, जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे.
जागतिक हवामान दिन हा केवळ दिवस नाही तर पर्यावरणाशी नातं समजून घेण्याची संधी आहे. शेतकरी, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा समन्वय साधल्यास भारतातील अन्नसुरक्षा, GDP आणि पर्यावरण संतुलन राखता येऊ शकते.
गुणवंत एस. डफरे
वरीष्ठ कृषीतज्ञ
