पुणे : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाने आपल्या ऐतिहासिक आणि जुन्या अभिलेखांचे जतन करण्यासाठी डिजिटायझेशन प्रकल्पाला वेग दिला आहे.
या प्रकल्पामुळे १८६५ ते २००१ या प्रदीर्घ कालावधीतील सर्व महत्त्वाचे दस्त, विवाह अभिलेख आणि छायाचित्र आणि सीडी स्वरूपातील रेकॉर्ड आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संगणकीकृत केले जाणार आहेत.
e search igr maharashtra यामुळे नागरिकांना जुन्या मालमत्तांचे टायटल शोधणे अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे.
राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये धुळीने माखलेल्या आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या १८६५ ते २००१ मधील बारनिशी, छापील दस्त आणि विवाह नोंदणीच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग केले जाणार आहे.
तसेच, पुणे येथील शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालयातील १९२७ ते २००१ या कालावधीतील फिल्म, मायक्रोफिल्म आणि सीडी स्वरूपातील अभिलेखांचेही डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.
यामध्ये केवळ स्कॅनिंगच नव्हे, तर दस्तांचे संवर्धन आणि पुनर्स्थापना ही केली जाणार आहे. या कामासाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती नुकतीच नोंदणी विभागाने केली आहे.
हे सर्व दस्तऐवज केवळ साठवले जाणार नाहीत, तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीद्वारे क्लाउडवर सुरक्षित ठेवले जातील.
उच्च दर्जाचे स्कॅनिंग, मेटाडेटा नोंद आणि शास्त्रीय अनुक्रमणिका यामुळे एखादा विशिष्ट दस्त शोधणे अत्यंत जलद होणार आहे.
नागरिकांना होणारे फायदे
◼️ १८६५ पासूनचे दस्त आता ई-सर्च प्रणालीवर घरबसल्या पाहता येतील.
◼️ मालमत्ता खरेदी-विक्री करताना जुने दस्त सहज मिळाल्याने मालमत्तेचा मालकी हक्क तपासणे सुलभ होईल.
◼️ कागदपत्रे फाटणे, खराब होणे किंवा हरवण्याचा धोका संपणार आहे.
◼️ डिजिटल बॅकअपमुळे आग किंवा पुरासारख्या आपत्तीतही डेटा सुरक्षित राहील.
◼️ कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नसल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल.
अधिक वाचा: पावसाचे निसर्ग संकेत; वाचा निसर्गातील कोणकोणते सजीव कसे देतात पाऊस येण्याचे संकेत?
