मेहरून नाकाडे
रत्नागिरी: मधुमेह झाल्यानंतर गोड गोष्टी टाळण्याबरोबरच भात खाण्यावरही बंधन येते. मात्र, ग्लासेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असलेली भाताची नवी जात (वाण) शोधण्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्याशिरगाव येथील भात संशोधन केंद्राला यश आले आहे.
ग्लासेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी आणि प्रोटीन्सचे भरपूर प्रमाण या भातामध्ये असल्याने आता मधुमेहींना बिनधास्त हा भात खाता येईल. शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या विविध जातींचे संशोधन केले आहे.
विविध प्रकारच्या भातामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण ५५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे मधुमेही भात खाणेच टाळतात. यावर संशोधन सुरू होते आणि त्यातून ग्लासेमिक इंडेक्सचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असणारे वाण तयार करण्यात यश आले आहे.
जैवसंपृक्त biofortified वाण
कॅल्शिअम, लोह, झिंकांचे प्रमाण वाढविण्यासाठी डॉक्टर काही गोळ्या देतात. मात्र हे घटक भातातून उपलब्ध झाले तर त्यासाठीच्या गोळ्या टाळता येतील. नवीन वाणामध्ये हे घटक असल्यामुळे त्याला जैवसंपृक्त वाण म्हणूनही संबोधले जाणार आहे. औषधे घेण्यापेक्षा नैसर्गिकरीत्या पोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जैवसंपृक्त भाताचे वाण आता मधुमेही रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय ठरणार आहे.
भातातून प्रथिनेही
डाळीतूच्या सेवनातून प्रथिने मिळतात. डाळीमध्ये ६ ते ७ टक्केच प्रथिने असतात. मात्र आता भातातून प्रथिने मिळणार आहेत. नवीन संशोधित वाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ ते २० टक्के असेल. डाळींच्या वाढत्या दरापेक्षा मुबलक प्रथिने असणारे भाताचे वाण तयार करण्यात यश आले आहे.
राष्ट्रीयस्तरावर चाचणी
सध्या या भाताची स्थानिक पातळीवर चाचणी सुरू आहे. लवकरच राज्य व राष्ट्रीयस्तरावर चाचणीसाठी देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना येत्या दोन वर्षात हे नवे वाण उपलब्ध होईल. त्यानंतर नूतन विकसित वाणाचे नामकरणही होणार आहे. थोडा अवधी जाईल परंतु मधूमेहींना संशोधनामुळे दिलासा लाभला आहे
रत्नागिरी ७ या भातामध्ये आर्यन, लोह, झिंकाचे प्रमाण मुबलक आहे. तो रुग्णांसाठी उपयुक्त भात आहे. मात्र, लाल रंग असल्याने त्याबाबत नाक मुरडले जाते. यावर पर्याय म्हणून कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून भरपूर जीवनसत्व व पोषक घटक असलेला, परंतु रंगाने पांढरा असलेल्या भाताचे संशोधन करण्यात आले आहे. राष्ट्रीयस्तरावर चाचणीनंतर ते प्रसारित केले जाणार आहे. - डॉ. विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव
अधिक वाचा: गुजरातमधील भरुच शेंगदाण्याला टक्कर देण्यासाठी कोंकण कृषी विद्यापीठाचा नवीन वाण; वाचा सविस्तर