शेती म्हणजे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची आत्मा. या आत्म्याला दिशा देणारा, वर्षभर राबणारा, खांद्यावर शेतशिवाराचे ओझे घेणारा, कधीही न तक्रार करणारा सर्जा-राजा म्हणजे आपला बैल. या मुक्या जीवाच्या कष्टांची जाणीव ठेवत त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे ‘बैलपोळा’. श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण शेतकऱ्याच्या आणि बैलाच्या ऋणानुबंधाचा उत्सव आहे.
पोळ्याच्या दिवशी पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या घरोघरी तयारी सुरू होते. बैलांना आंघोळ घालून त्यांचे शिंग रंगवले जाते, पाठीवर झुल घालतात, गळ्यात कवड्यांच्या माळा, घंटा आणि शिंगांना सजावटीचे बेगड घालतात. जुन्या वेसण काढून नवी घालतात. त्यांच्या पाठीवर गेरूने ठिपके काढले जातात. सायंकाळी सर्व बैलजोड्या गावात मिरवणुकीसाठी एकत्र येतात. ढोल-ताशांच्या गजरात, शेतकऱ्यांचे परिवार त्यांचा सर्जा-राजा मिरवत असतो. घरातल्या महिला बैलांची आरती करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात.
या दिवशी केवळ बैलच नव्हे तर त्याच्या सेवेत असणाऱ्या बैलकऱ्यांनाही नवीन कपडे आणि मान दिला जातो. ज्या घरात बैल नाहीत तिथे मातीचे किंवा लाकडाचे बैल पूजले जातात. या सणात केवळ धार्मिक भावना नसतात तर एक सामाजिक आणि पर्यावरणीय संदेशही असतो. कृतज्ञतेचा, श्रमपूजेचा आणि सहजीवनाचा.
आज जरी शेती यंत्रांनी सुकर झाली असली तरी ग्रामीण भागात बैलाचे महत्त्व कमी झालेले नाही. तो फक्त शेतीचा सहाय्यक नाही तर शेतकऱ्याचा मित्र, कुटुंबाचा सदस्य आहे. सिंधू संस्कृतीपासून चालत आलेली ही बैलपूजेची परंपरा आजही टिकून आहे यामागे केवळ श्रद्धा नाही तर संवेदनशीलता आणि शाश्वततेचा विचार आहे.
जेव्हा माणूस माणसासाठी उभा राहत नाही तेव्हा हा मुक्या जीव शेतकऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून राबतो पिढ्यानपिढा हे बंध अतूट राहिले आहेत. शेतकऱ्याच्या अश्रूंना कधीही शब्द नसतात पण त्यांच्या बैलाच्या सजावटीतून, त्याच्या डोळ्यातील ओलाव्यातून आणि आरतीतून कृतज्ञतेचा हा सण बोलका होतो हेच बैलपोळ्याचे खरे सौंदर्य.