कोल्हापूर : 'गोकुळ' व एनडीडीबी मृदा तसेच 'सिस्टीमा' बायो यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'गोबरसे समृद्धी' कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेअंतर्गत नवीन पाच हजार बायोगॅस युनिटला मंजुरी मिळाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, आतापर्यंत 'गोकुळ'ने ७२०० दूध उत्पादक कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला आहे. बायोगॅसच्या माध्यमातून स्वयंपालकासाठी स्वस्त, सुरक्षित व प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध होत आहे.
अनुदानावर दूध उत्पादकांना हे युनिट उपलब्ध होणार असून गॅस सिलिंडर वापरावरचा खर्च वाचणार आहेच, त्याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे.
संघामार्फत या योजनेबाबत परिपत्रक जारी करण्यात आले असून, कोल्हापूर जिल्हा तसेच सीमाभागातील गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांचे उत्पादक या योजनेस पात्र आहेत.
'गोबरसे समृद्धी' ही केवळ ऊर्जा निर्मिती नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा आहे. प्रत्येक दूध उत्पादकाने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मुश्रीफ यांनी केले.
अनुदानापोटी २४.८० कोटी
◼️ मागील दोन टप्प्यातील बायोगॅस युनिटच्या माध्यमातून महिला दूध उत्पादकांना २४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.
◼️ वस्तू व सेवाकर (GST) कपात झाल्यामुळे बायोगॅस युनिटच्च्या किमतीतही घट झाली आहे.
नवीन बायोगॅस मॉडेलमध्ये या झाल्या सुधारणा
◼️ आधुनिक चार्जिंग लाइटर.
◼️ शेण ढवळण्यासाठी मिक्सिंग टूल.
◼️ अतिरिक्त सेफ्टी व्हॉल्व्ह.
◼️ पुनर्वापर करता येणारा फिल्टर.
◼️ गॅस सिलिंडरवरील वार्षिक बचत - १५ ते १८ हजार.
असे मिळते अनुदान
◼️ दोन घनमीटर क्षमतेचे बायोगॅस युनिट युनिटची किंमत - ४१,२६० रुपये.
◼️ अनुदान - ३१,८९४ रुपये.
◼️ दूध उत्पादकांना भरावे लागणार - ९,३६६ रुपये.
अधिक वाचा: गाईच्या पोटात सापडली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी; काय हाय विषय? वाचा सविस्तर
