रत्नागिरी : गेल्या चार दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान आहे. माणसांना उष्णतेच्या झळा असह्य होत असतानाच आंबा पिकावरही उष्णतेचा परिणाम होत आहे.
उच्चत्तम तापमानामुळे आंब्यावर डाग पडत असून, फळगळही वाढली आहे. आधीच उत्पादन कमी असतानाच उष्णतेमुळे आंबा डागाळून खराब होत आहे.
या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली. डिसेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहर प्रक्रिया सुरू झाली. जानेवारीत कडाक्याच्या थंडीत मोहोर भरपूर आला. मात्र, फुलोरा सर्वाधिक राहिला. फळधारणा अत्यल्प झाली.
थंडीमुळे पुनर्मोहर सुरू झाल्याने फळगळ झाली. तुडतुडा, थ्रीप्सचे संकट तर अद्याप आहे. एकूणच या वर्षी आंबा पीक संकटात असताना पीक उष्मा लाटेचे शिकार बनले आहे.
पीक वाचविण्यासाठी बागायतदारांची धडपड सुरू असून, नैसर्गिक संकटापुढे वापरलेले पर्याय कमकुवत ठरत आहेत.
नैसर्गिक संकटामुळे यावर्षी अवघे २५ टक्के उत्पादनआंबा उत्पादन नैसर्गिक संकटात सापडले असल्यामुळे या वर्षी अवघे २५ टक्केच उत्पादन असल्याचे बागायतदार सांगत आहेत.
थ्रीप्सवर प्रभावी कीटकनाशके नाहीतथ्रीप्सचे आंब्यावरील संकट कायम असून, त्यावर बाजारात प्रभावी कीटकनाशक नाहीत. औषध विक्रेते सुचवतील. त्याप्रमाणे कीटकनाशक वापरले जात आहे.
उष्णतेमुळे फळांची गळवाढत्या उष्णतेमुळे फळांची गळ होत आहे, तसेच फळे भाजत असून, फळांवर काळे डाग पडत आहेत. डाग पडलेला/भाजलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यामुळे बागायतदारांचे दुहेरी नुकसान होत आहे. दि. २६ जानेवारीपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. या वर्षी नैसर्गिक संकटामुळे आंबा उत्पादन पुन्हा संकटात आले आहे.
अधिक वाचा: Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय
आंब्याच्या झाडांना पाणी देत राहण्याचे आवाहनतीव्र उष्णतेची झळ आंबा पिकाला बसत असून, फळावर काळे डाग पडत असून, फळांची गळही सुरू झाली आहे. कृषी विद्यापीठातर्फे झाडांना पाणी देण्याची सूचना केली आहे. मात्र, डोंगर, कातळावर बागा असल्याने सर्वत्र पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे बागायतदारांपुढे संकट निर्माण झाले आहे. आंबा पीक वाचविण्याची बागायतदारांची धडपड सुरू आहे. मार्चपूर्वीच या वर्षी उष्णतेची लाट आल्याने बागायतदार धास्तावले आहेत.
दरवर्षी आंबा पिकाला नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आंबा पीक दिवसेंदिवस खर्चिक बनले असून, उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात येत आहेत. या वर्षी उत्पादन कमी असताना उष्णतेमुळे आंबा भाजत असल्याने वाचवणे अशक्य झाले आहे. - राजन कदम, आंबा बागायतदार