शेवगा हा एक बहुउपयोगी वृक्ष आहे. या वृक्षाची फुले, पाने तसेच शेंगांचा वापर विविध प्रकारच्या पाककृती बनवण्यासाठी केला जातो.
दुधाच्या ४ पट आणि मटणाच्या ८०० पट कॅल्शियम व फॉस्फरस, तुरट असूनही हा चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण दूर करणारी ही भाजी अत्यंत पौष्टिक मानली जाते.
शेवग्याच्या पानांची भाजी ही सहज उपलब्ध होणारी रक्तदाब नियंत्रित करणारी रानभाजी आहे. बाळाच्या पाचवीला ही भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून दाखवली जाते आणि नंतर बाळाच्या आईला खाण्यास दिली जाते, ज्यामुळे तिला पोषण मिळते.
शेवग्याच्या पानांच्या रसाने केसांना मालिश केल्याने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. तोंड येणे, घशात सुज येणे, वांती किंवा खरुज यांसारख्या समस्यांवर शेवग्याच्या पानांचा रस गुळण्या करणे हे सर्वोत्तम.
शेवग्याच्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळतात.
ही पाने केवळ भाजी म्हणून नव्हे, तर लोणच्यात, सॅलडमध्ये आणि सूपमध्ये वापरली जातात. शेवगा सेवनाने पचनक्रियेसंबंधी आजार दूर होतात.
काविळीच्या आजारामध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस एक चमचा मधात आणि नारळ पाण्यात मिसळून पिल्यास आराम मिळतो.
शेवग्याच्या पानांची भाजी
◼️ शेवग्याच्या पानांचा पाला स्वच्छ धुऊन निथळून घ्यावा.
◼️ मुगाची डाळ एक तास आधी पाण्यात भिजत ठेवावी आणि नंतर निथळून घ्यावी.
◼️ जिरे, हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र वाटून घ्यावे.
◼️ कढईत तेल गरम करून फोडणी घालावी.
◼️ तयार केलेला मसाला फोडणीत घालून चांगला परतून घ्यावा.
◼️ त्यानंतर भिजवलेली डाळ घालून परतावी. डाळ शिजल्यानंतर शेवग्याची पाने घालावीत.
◼️ चवीनुसार मीठ घालून मिश्रण मोकळे होईपर्यंत शिजवावे.
शेवग्याच्या पानांपासून काय काय बनवू शकतो?
शेवग्याच्या पानांना थोडी तुरट-कडू चव असली तरी, योग्यरीत्या बनवल्यास ती खूप चवदार लागते. शेवग्याच्या पानांपासून सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगापुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगांची रसभाजी आणि पाण्याची कढी अशा अनेक प्रकारच्या पाककृती बनवता येतात.
शेवग्याची भाजी खाण्याचे फायदे
◼️ हाडे ठिसूळ होणे, वजन वाढणे, आळस आणि थकवा जाणवत असेल तर शेवग्याच्या पानांची भाजी खाणे अत्यंत लाभदायक ठरते.
◼️ शेवग्याची भाजी रक्तवर्धक असून, हाडांना बळकटी देते.
◼️ शारीरिक आणि मानसिक थकवा तसेच अशक्तपणा जाणवत असल्यास शेवग्याच्या पानांची भाजी ऊर्जा देते.
◼️ शेवग्याच्या फुलांची भाजी संधिवातासाठी अत्यंत चांगली मानली जाते.
◼️ शेवग्याच्या शेंगासुद्धा स्नायुगत संधिवातासाठी आणि कृमिनाशक म्हणून उपयुक्त आहे.