नीरा खोऱ्यातील धरण साठ्यात ९७.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजा यंदा सहज भागणार आहेत.
भाटघर, नीरा-देवघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांची एकूण क्षमता ४९ टीएमसी असून, सध्या त्यामध्ये ४७.२२४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
यावर्षी पावसाळ्यात भाटघर, नीरा-देवघर आणि वीर ही धरणे १०० टक्के भरल्याने मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा लक्षणीयरीत्या चांगला आहे.
नीरा खोऱ्यातील मुबलक पाणीसाठ्यामुळे असून, अनेक गावांमध्ये सहकारी उपसा सिंचन योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरळीत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या आधारावर फळबागा घेतल्या असून, यंदा त्यांना पाण्याची तूट भासणार नाही.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तसेच गहू, हरभरा, टोमॅटो, कांदा आदी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
काढणी झाल्यानंतर चारापिके कडवळ, मका, घास आदी घेणे शक्य होणार असल्याने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही सोडविला जाणार आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही शिवाय उन्हाळी पिके घेण्यासही मोठी मदत होणार आहे.
नीरा उजव्या कालव्यात पाणी सोडले
◼️ नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने पुढच्या पावसाळ्यात जुलैपर्यंत पाऊस कमी झाला, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
◼️ शेतीसाठी व पिण्यासाठी नीरा उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले असून, त्याचा लाभ या भागातील शेतकरी वर्ग व पाणीपुरवठा संस्थांना होणार आहे, असे धरण प्रशासनाने सांगितले.
अधिक वाचा: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग
