सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी, निसर्गाने पुन्हा एकदा हिरवाईने नटले आहे. या काळात डोंगराळ भागात आणि जंगलांमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या, औषधी वनस्पती आणि कंदमुळे विपुल प्रमाणात उगवतात.
त्यांचा उपयोग करून आदिवासी महिला आणि तरुण मंडळींनी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक बाजारपेठ यांचा सुंदर मेळ घालण्यास सुरुवात केली आहे.
माळशेज घाट, हरिचंदगड, आंबेगव्हाण, मुथाळणे, चिल्हेविडी आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून रानभाज्यांचा हंगाम सुरू झाला आहे.
या भागातील महिलांचा समूह सकाळपासून जंगलात जाऊन हदग्याची फुले, बदडा, कोळू, कुरहू, आंबाडी, करटुले, भारंगी, राजगिरा, घोळ, सराटे, भुईआवळी, कपाळफोडी, कानफुटी, आंबट पाचुका अशा डझनभर रानभाज्या गोळा करण्यासाठी सक्रिय आहे.
या भाज्या केवळ चवीसाठी किंवा पोषणासाठीच नाहीत, तर त्यांचे औषधी गुणधर्मही मोठ्या प्रमाणावर मान्य आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्याविषयी वाढत्या जागरूकतेमुळे शहरांमधील नागरिकही रानभाज्यांकडे आकर्षित झाले आहेत.
आयुर्वेदिक उपचार, नैसर्गिक आहार, डिटॉक्स कार्यक्रम आणि पर्यायी पोषण पद्धतींमध्ये या भाज्यांचा वापर वाढल्याने त्यांना बाजारपेठेत नवा प्रतिसाद मिळत आहे.
स्थानिक महिला बचत गटांनी हा बदल ओळखून रानभाज्यांचे संकलन, वर्गीकरण आणि विक्री यावर भर दिला आहे. ओतूरचे शांताराम वारे हे गेल्या सहा वर्षांपासून या उपक्रमात अग्रेसर आहेत. त्यांनी महिलांना एकत्र करून रानभाज्यांचे संकलन करण्यास प्रोत्साहित केले.
त्यानंतर त्यांचे वर्गीकरण, स्वच्छता, वाळवणं, पॅकिंग आणि विक्री यासाठी प्रशिक्षण दिले. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला बचत गटांनी प्रदर्शनांत स्टॉल लावून रानभाज्यांची विक्री सुरू केली आहे.
रेसिपी सांगणे, भाज्यांचे औषधी गुण समजावून सांगणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे यामुळे महिलांना आत्मविश्वास मिळाला आहे.
शांताराम वारे सांगतात, "आमच्या भागातल्या महिलांकडे निसर्गाचे मोठे वरदान आहे; पण त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे त्यांना माहिती नव्हते. आता आम्ही त्यांच्या हाताला काम आणि उत्पन्न दिलं आहे.
आहारासंदर्भात इतरांना मार्गदर्शनाला सुरूवात
काही महिलांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित घरगुती उपचार आणि आहार योजना तयार करून इतर महिलांना मार्गदर्शन करण्यासही सुरुवात केली आहे. पूर्वी आम्ही भाज्या गोळा करून घरासाठी वापरत असू. आता त्यावरून आमच्या गटाला उत्पन्न मिळते असे बचत गटातील महिलांनी सांगितले.
अधिक वाचा: चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर