Join us

सांगोला सिंचन योजनेसाठी ८८३ कोटींच्या खर्चाला मान्यता, लवकरच कामाला सुरवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:18 IST

सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांतील ३९ हजार एकर क्षेत्राला वरदायिनी असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला सोमवारी (दि. ५ फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांतील ३९ हजार एकर क्षेत्राला वरदायिनी असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला सोमवारी (दि. ५ फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या योजनेच्या कामासाठी सुमारे ८८३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मान्यता मिळाल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सन १९९७ मध्ये मूळ मंजूर असलेली ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन २००० मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र समाविष्ट होते. आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी सन २०२० सालापासून या कामाची मागणी केली व नव्याने १२ वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील गावांसाठी प्रस्ताव तयार करून ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला.

योजना पूर्ण करण्यासाठी ८८३ कोटींच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली. आ. शहाजीबापू पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसरकारकडून १७ नोव्हेंबर २०२२ मध्ये या योजनेचे स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण केले होते.

या योजनेतून दीड टीएमसी पाणी बंदिस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, य. मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या १२ गावांना सुमारे ३३ हजार एकर क्षेत्राला व अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा ५ वरील सुमारे सहा हजार एकर अशा ३९ हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहेत.

लवकरच निविदांची प्रसिद्धीस्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला ही योजना सांगोला तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खर्चाची योजना आहे. लवकरच या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ही योजना मंजूर करण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे योगदान आहे. सांगोला तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा व उजनीचे दोन टीएमसी पाण्यासह सांगोला तालुक्याला सुमारे १२ टीएमसी पाणी मंजूर केल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पसोलापूरशेतकरीशेतीबाळासाहेब ठाकरेराज्य सरकारसरकारएकनाथ शिंदेअजित पवारदेवेंद्र फडणवीसरणजितसिंह नाईक-निंबाळकर