सोलापूर : ऑगस्ट महिन्यात उत्तर, दक्षिण व अक्कलकोट तालुक्यातील १० मंडळांत झालेली अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे ५९ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले.
पैसे मंजूर असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठीच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. पात्र ६० हजार शेतकऱ्यांपैकी बावीस हजार शेतकऱ्यांचे पैसे ईकेवासीसाठी अडकले, तर ११६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ लाख रुपये जमा झाले आहेत.
ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यात एकूण १७५ मि.मी. १६३ टक्के इतका पाऊस पडला होता. याशिवाय उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व व अक्कलकोट तालुक्यातील १० मंडलांत अतिवृष्टी झाली होती.
या मंडलात पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. तसेच भीमा व इतर नद्यांना आलेल्या पुरामुळे पीके पाण्यात जाऊन नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ६० हजार इतकी आहे.
या शेतकऱ्यांना ५९ कोटी ७९ लाख १६ हजार रुपये मंजूर आहेत. ऑगस्टमधील नुकसानीची १२ सप्टेंबरला रक्कम मंजूर झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा पुन्हा अतिवृष्टी व नुकसानकारक पाऊस पडत राहिला व सीनेला पूर आला.
यामध्ये संपूर्ण प्रशासन अडकले. यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांची खाती ऑनलाईन टाकण्यास विलंब होत आहे.
गुरुवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ७३४ बँक खाती ऑनलाईन झाली, तर त्याची रक्कम २४ कोटी ४० लाख ४८ हजार रुपये होतात.
त्यापैकी ११६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ लाख ८६५ रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. २१ हजार ७५१ शेतकऱ्यांचे २३ कोटी ४१ लाख केवळ ई-केवायसी केली नसल्याने पैसे जमा होत नाहीत.
जुन्या निकषानुसार मदत..
◼️ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरपर्यंत जिरायत प्रति हेक्टर आठ हजार पाचशे, बागायत १७ हजार, तर फळबागांसाठी बावीस हजार पाचशे प्रमाणे रुपयाने पैसे जमा केले जात आहेत.
◼️ पंढरपूर तालुक्यातील ११५४, उत्तर तालुक्यातील दहा, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.
◼️ मंजूर ६० कोटींमध्ये उत्तर तालुक्यात सर्वाधिक २६ कोटी तीन लाख, अक्कलकोट तालुक्यात १४ कोटी चार लाख, दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी १२ कोटी १४ लाख रुपये, तर पंढरपूर तालुक्यासाठी चार ७० लाख ५० हजार रुपये मंजूर आहेत. इतर तालुक्यासाठी यापेक्षा कमी रक्कम ऑगस्ट महिन्यातील नुकसानीची मंजूर आहे.
अधिक वाचा: पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा जीआर आला; कोणत्या घटकाला किती मदत? वाचा सविस्तर