Join us

उसाचे पैसे न देणारे राज्यातील ३३ कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर; काय होणार कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:11 IST

Sugarcane FRP 2024-25 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देणाऱ्या राज्यातील १५ साखर कारखान्यांवर मागील महिन्यात आरआरसीची कारवाई केली असताना आता ३३ साखर कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर आहेत.

सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देणाऱ्या राज्यातील १५ साखर कारखान्यांवर मागील महिन्यात आरआरसीची कारवाई केली असताना आता ३३ साखर कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर आहेत.

येत्या बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली असून, त्यानंतर या कारखान्यांवर कारवाई केली जाणार आहे. राज्याचा ऊस हंगाम यंदा लवकर आटोपला आहे. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने संपूर्ण राज्यातच साखर हंगाम जेमतेम झाला.

ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सव्वा कोटी मेट्रिक टन गाळप करून राज्यात आघाडीवर असले तरी जिल्ह्याचे गाळप यंदा कमीच झाले आहे.

कोल्हापूर नंतर पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप झाले आहे. यंदा ऊस गाळप कमी झाले आहे. मात्र, या उसाचेही पैसे साखर कारखानदार देण्यास तयार नाहीत. गाळप घेतलेल्या २०० पैकी मार्च अखेपर्यंत ९५ साखर कारखान्यांनी १,४३२ कोटी रुपये थकविले आहेत.

मार्च अखेरला राज्यातील १५ साखर कारखान्यांवर आरआरसी अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील ३३ साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची तयारी साखर आयुक्त कार्यालयाने दर्शवली आहे. त्यासाठी साखर कारखानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

येत्या बुधवारी (१६ एप्रिल) रोजी सुनावणीवेळी एफआरपीबाबत लेखी म्हणणे द्यावयाचे आहे. सुनावणीनंतर लागलीच आरआरसी अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षी उशिराने उसाचे पैसे..◼️ सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखानदार ऊस तोडणी यंत्रणा पुरेशी भरतात. कमी कालावधीत भरपूर ऊस गाळप करतात. सुरुवातीच्या १५ दिवसात उशिराने तोडणी केलेल्या उसाचे पैसे जमा केले जातात. त्यानंतर शेतकऱ्यांना पैशासाठी अडकवले जाते. दरवर्षीच भाग बदलून शेतकऱ्यांना वेठीस धरणारे काही ठरावीकच साखर कारखाने आहेत.◼️ आजरा, भोगावती (कोल्हापूर), कर्मयोगी शंकरराव पाटील इंदापूर, साईप्रिय शुगर (जुना भीमा दौंड), किसनवीर सातारा या साखर कारखान्यांनी ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील उर्वरित तीन-चार कारखान्यांकडे किरकोळ रक्कम थकली असली तरी इतर कारखान्यांनी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.

सोलापूरच्याही कारखान्यांचा समावेश◼️ एफआरपीची रक्कम ५९ टक्क्यांपर्यंत थकविलेल्या १५ साखर कारखान्यांची अगोदर आरआरसी केली असताना आता ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी थकविलेल्या ३३ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईची नोटीस बजावली आहे. हे ३३ साखर कारखाने संपूर्ण राज्यातच आहेत.◼️ कारवाईच्या नोटीसमध्ये श्री. सिद्धेश्वर सोलापूर, श्री. संत दामाजी मंगळवेढा, भैरवनाथ शुगर लवंगी, भैरवनाथ आलेगाव, जय हिंद शुगर, भीमा टाकळी सिकंदर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे पंढरपूर, भैरवनाथ शुगर (जुना शिवशक्ती), भैरवनाथ शुगर सोनारी, भैरवनाथ शुगर (जुना तेरणा ढोकी) या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

अधिक वाचा: शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय; वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसमहाराष्ट्रआयुक्तपुणेसोलापूरकोल्हापूरशेतकरीशेतीसांगली