वारणा सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मस्टायटीस (स्तनदाह) सारख्या असाध्य रोगावर प्रतिबंध करणाऱ्या तंत्रज्ञानाचे संशोधन करून मस्टायटीस प्रतिबंधक पशुखाद्याची निर्मिती केली आहे.
अशाप्रकारचे पशुखाद्य तयार करणारा वारणा दूध संघ देशातील पहिला असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
कोरेनगर येथील संघाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी मस्टायटीस प्रतिबंधक पशुखाद्य व हिपर कॅटल फिड विक्रीचा प्रारंभ उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत झाला.
कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी प्रास्ताविकात मस्टायटीसमुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने हे पशुखाद्य जनावरांना संजीवनी देणारे ठरेल असे सांगितले.
एच. आर. जाधव म्हणाले, तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून वारणा संघाची निर्मिती झाली. आज संघ जागतिक पातळीवर चमकला. आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती सुरू आहे.
ज्येष्ठ संचालक शिवाजीराव मोरे, पशखाद्य व्यवस्थापक डॉ. जे. बी. कुलकर्णी, पशुवैद्यकीय व्यवस्थापक डॉ. जे. बी. पाटील यांनी वारणेने निर्माण केलेली पशुखाद्ये दूध उत्पादकांना उपयोगी पडणार असल्याचे सांगितले.
वारणा बँकेचे संचालक प्रमोदराव कोरे, दूध साखर वाहतूक संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील, संघाचे संचालक शिवाजी कापरे, अॅड. एन. आर. पाटील, शिवाजीराव जंगम, चंद्रशेखर बुवा उपस्थित होते.
अरुण पाटील, के. आर. पाटील, लालासाहेब पाटील, राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे, दीपक पाटील, माधव गुळवणी आदी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक व्ही. टी. पाटील यांनी आभार मानले.
स्तनदाह तपासणी, नियंत्रण कार्यक्रम यशस्वी
वारणा परिसरातील १८१ दूध संस्थांच्या ७६८१ जनावरांच्या दुधाचे नमुने तपासले. त्यात सरासरी ३० टक्के जनावरांमध्ये स्तनदाह आजार आढळला. प्रतिजैवकाचा वापर न करता मस्टायटीस प्रतिबंधक वारणा पशुखाद्याचा वापर केल्यामुळे हा आजार १०० टक्के बरा होऊन दूध उत्पादन, प्रत वाढ झाल्याने प्रतिलिटर २.१० रुपयांचा उत्पादकांना नफा झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी. पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: Sugarcane FRP : हंगामाच्या शेवटीच साखर उतारा होणार निश्चित; केंद्र सरकारचे नवीन परिपत्रक