मागील काही वर्षात हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे वादळी वारा व वीजांसह मोठा पाऊस पडत आहे. यात शेतकरी तसेच जनावरे यांचे वीज पडून दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.
वीज पडून दगावलेल्या जनावरांसाठी नैसर्गिक आपत्तीमधून मदत उपलब्ध आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यास, अल्प आणि अत्यल्पभूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाते.
त्यासाठी जनावर दगावले असल्यास तलाठी यांचा पंचनामा तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पोस्टमार्टम अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
अशी मिळणार मदत
१) दुधाळ जनावरे
म्हैस, गाय, उंट - ३०,००० रुपये.
मेंढी, बकरी, डुक्कर - ३,००० रुपये.
२) ओढकाम करणारी जनावरे
उंट, घोडा, बैल - २५,००० रुपये.
वासरू, गाढव, शिंगरू, खेचर - १६,००० रुपये.
लागणारी कागदपत्रे?
जनावरांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये प्रामुख्याने साध्या कागदावर अर्ज करावा लागेल किंवा जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांना तोंडी माहिती द्यावी लागेल.
जनावराची ऑनलाइन नोंदणी हवीच!
◼️ जनावरांना ऑनलाइन टॅगिंगद्वारे ओळख देणे हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे; परंतु अजूनही बरेच पशुपालक टॅगिंग करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होते.
◼️ आपल्याकडील सर्व पशुधनाचे टॅगिंग करावे. वासरे/करडे जन्मल्यानंतर एक महिन्यामध्ये टॅगिंग करणे आवश्यक आहे.
◼️ टॅगिंग केल्यामुळे आपल्या जनावरांना एक ओळख मिळते.
◼️ जनावराने दिलेल्या उत्पादनाविषयी नोंद करणे सोपे होते. कोणत्या जनावरांची उत्पादनानुसार निवड करायची याबद्दल माहिती मिळते.
◼️ आपल्या गोठ्यातील एखादे जनावर दगावल्यास टॅगिंग असेल तर सरकारकडून आर्थिक मदत मिळवणे, विमा रक्कम मिळवणे किंवा काही सवलती मिळविण्यास मदत होते.
जनावरांची ऑनलाइन नोंदणी कशी?
◼️ जनावरांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.
◼️ तिथे जनावरांचे वय, जात, लिंग, मालकाची माहिती आणि इतर आवश्यक तपशील भरावा लागेल.
◼️ नोंदणी झाल्यावर, तुम्हाला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळेल.
◼️ नजीकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून आपल्या जनावरांना टॅग मारून घ्यावा.
◼️ शेळ्यांसाठी लहान टॅग आणि गायी, म्हशींसाठी मोठे टॅग उपलब्ध आहेत.
◼️ टॅगिंग केल्यानंतर आपल्या पशुधनाबाबत सर्व नोंदी ऑनलाइन ठेवल्या जातात.
अधिक वाचा: गाय व म्हैस व्याल्यानंतर वार कशामुळे अडकते? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर