धनकवडी : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (कात्रज डेअरी) ने प्रतिलिटर दोन रुपयांचा दर फरक देत तब्बल १३.५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले.
या निर्णयामुळे हजारो दूध उत्पादकांना दिलासा मिळत ग्रामीण अर्थचक्राला नवसंजीवनी मिळाली आहे. कात्रज डेअरीने शब्दपूर्ती करून दर फरकाचा हजारो शेतकऱ्यांना लाभ दिला आहे.
कागदोपत्री घोषणांचा बाजार मांडणाऱ्यांमध्ये हा निर्णय वेगळा ठरतो. कारण येथे घोषणा नाही, तर थेट खात्यात पैसे पोहोचले आहेत.
दर फरकाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात आली. ऑक्टोबर २०२५ मध्ये पहिल्या टप्प्यात प्रतिलिटर १ रुपयाप्रमाणे ६ कोटी ७५ लाख १२ हजार रुपये वितरित करण्यात आले.
या टप्प्यात ८६५ दूध संस्थांमार्फत हजारो शेतकऱ्यांना लाभ झाला. त्यानंतर मार्च २०२६ च्या दूध बिलात उर्वरित १ रुपया दर फरक जमा करत संघाने दिलेला शब्द पूर्ण केला.
संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्निल ढमढेरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. आम्ही घोषणा करणारे नाही, तर निर्णय तत्काळ अंमलात आणणारे आहोत.
ग्रामीण भागात संघाचा 'आधारस्तंभ' म्हणून उभा राहणारा हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही, तर विश्वासाची पुनर्स्थापना आहे. घोषणांपेक्षा कृती मोठी असते, हे सिद्ध करीत संघाने शेतकऱ्यांच्या मनात आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. - अॅड. स्वप्निल ढमढेरे, अध्यक्ष, कात्रज डेअरी
अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक
