राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यात म्हशींचे वंध्यत्व ही शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत असून, वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणामागे नेमके काय कारणे आहेत? याचा शोध इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड, अमेरिका (इडीफ) घेणार आहे
यासाठी, जिल्ह्यातील १७०० गाभण न राहिलेल्या म्हशींच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर 'गोकुळ'दूध संघ त्यावर उपचाराबाबतचे पुढचे पाऊल उचलणार आहे.
इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका (इडीफ) ही कंपनी संशोधनासाठी फंड उपलब्ध करून देते. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बायफ) उरळीकांचन यांच्या माध्यमातून 'गोकुळ'ला त्यांनी १ कोटी ४६ लाख रुपये संशोधनासाठी दिले आहेत.
'गोकुळ' समोर म्हैस वंध्यत्वाचे खरे आव्हान आहे, त्यासाठी हा फंड खर्च करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.
बाजारपेठेतील म्हैस दुधाची मागणी वाढत असल्याने परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळ संघ ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहे.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हशी खरेदीसाठी एक हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हशींची संख्येबरोबर दूध वाढत असले, तरी वंध्यत्वाची समस्याही आहे. यासाठी हा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अमेरिकेत म्हैस दुधाची भुरळ
अमेरिकेत गायीचे गोठे मोठ्या प्रमाणात आहेत. भारतात विशेषतः महाराष्ट्राच्या दूध उत्पादनात म्हैस दुधाचे प्रमाण कोल्हापुरात अधिक आहे. अमेरिकेतही म्हैस दूध उत्पादन वाढवण्याचा मानस शास्त्रज्ञांचा आहे.
परराज्यातील म्हशी, पण वंध्यत्वाचा प्रश्न गंभीर
◼️ परराज्यातील जातिवंत म्हशी खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पण, त्यांचा वंध्यत्व कालावधी वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
◼️ जिल्ह्यातील आठ लाख म्हशी आहेत, त्या तुलनेत गाभण न राहणाऱ्या म्हशींची संख्या वाढत आहे. त्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.
एकीकडे म्हैस दूध वाढीचा कार्यक्रम हाती घेत असताना, वंध्यत्व ही समस्या डोके वर काढत आहे. यासाठी 'इडीफ'च्या माध्यमातून त्यावर संशोधन सुरू असून, त्याचा अहवाल आल्यानंतर आपणाला ठोस उपाययोजन करता येणार आहे. - डॉ. योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, गोकुळ
अधिक वाचा: दुभत्या जनावरांना उसाचे वाढे खायला देणं योग्य की अयोग्य; जाणून घ्या सविस्तर
