पुणे (दि. २४) : मानव आणि पशुधनाचे संबंध प्राचीन असून राज्याच्या विकासात पशुसंवर्धन व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यातील औंध येथे बीएसएल-३ व बीएसएल-२ जैवसुरक्षित प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भिय लस चाचणी व गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा तसेच सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल या प्रकल्पांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंत्री पंकजा मुंडे देखील प्रमुख उपस्थित होत्या.
या प्रसंगी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आमदार उमा खापरे, विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, सहआयुक्त डॉ. श्यामकांत पाटील, डॉ. याहयाखान पठाण व डॉ. गौरीशंकर हुलसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रयोगशाळा व हॉस्पिटलमुळे पशुसेवा अधिक सक्षम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, या नव्या सुविधांमुळे पशुरोग निदान, उपचार आणि लसीकरण अधिक वेगाने व प्रभावीपणे होणार आहे. यामुळे राज्यातील पशुसंवर्धन व्यवसाय अधिक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होईल.
दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कायदा
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये समुपदेशन पद्धतीचा प्रथमच अवलंब करण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे अधिकारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तर राज्यात अलीकडे दूध भेसळीच्या तक्रारी वाढत असून अशा प्रकारांवर लगाम घालण्यासाठी लवकरच एक कडक कायदा करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर प्लास्टिकच्या अति वापरामुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन प्लास्टिक बंदीबाबतही राज्य शासन पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी समन्वित प्रयत्नांची गरज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की पशुसंवर्धन व्यवसाय राज्याच्या अर्थचक्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. शासन यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यास कटिबद्ध आहे असेही त्यांनी नमूद केले.
१०० दिवसांच्या कार्यक्रमात विभागाचे विशेष यश
पशुसंवर्धन विभागाने राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या सुधारणा योजनेत पहिल्या पाच यशस्वी विभागांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनासाठी विभागाची बांधिलकी अधोरेखित झाली आहे असे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे पाळीव प्राण्यांना आधुनिक उपचार
शहरांमध्ये ९५-९६% रुग्ण हे पाळीव प्राणी असल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी उच्च दर्जाचे व्हेटरनरी हॉस्पिटल उभारण्याची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन औंध येथे सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. यासाठी पुणे महापालिकेने ३ कोटी व पिंपरी-चिंचवड महापालिकेने २ कोटी रुपये निधी दिला असून, या निधीतून हॉस्पिटलची इमारत उभारण्यात आली आहे.