राजाराम लोंढे
कोल्हापूर : सध्या देशभरात दुधाचा फ्लड सिझन सुरू झाला असला, तरी ज्या गतीने दुधाचे उत्पादन वाढणे अपेक्षित आहे, तेवढे होत नाही.
पाऊस, महापूर त्यातून दगावलेली जनावरे, दुभत्या जनावरांचे वाढलेले आजारपण यामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे फ्लड सिझनमध्ये दुधाबरोबर बटर, पावडरला उच्चांकी दर मिळत आहे.
गायदूध पावडर २५० रुपये किलोपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर चांगले आहेत. आपल्याकडे साधारणतः ऑक्टोबरपासून दुधाचा फ्लड सिझन सुरू होतो.
जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत हा हंगाम सुरू राहतो. या कालावधीत दुधाचे उत्पादन वाढते आणि दुधाबरोबरच पावडर, बटरच्या दरात घसरण होते.
मात्र, यंदा अतिवृष्टी, महापुरामुळे राज्यातील बहुतांशी भागाला फटका बसला आणि या हंगामात अपेक्षित दूध उत्पादन मिळत नाही. विशेष म्हणजे यंदा गाय दूध पावडर व बटरला आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला.
सध्या २५० रुपये किलोच्या पुढे गाय दूध पावडर, तर ५०० ते ५१० रुपये किलोने बटर जात आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पावडर १३५ ते १४० रुपये किलोने विक्री व्हायची.
बिहार, पश्चिम बंगाल येथून मागणी वाढली
बिहार आणि पश्चिम बंगाल येथून दूध पावडरची मागणी वाढली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत दर स्थिर राहण्यामागे हे एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
म्हैस दूध पावडर मिळेना
◼️ राज्यात म्हशीचे दूध लिक्वीडमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यात उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने म्हैस दूध कमी पडते. त्यामुळे म्हैस दुधाची पावडर मिळतच नाही. सध्या म्हैस दूध पावडर ३१५ रुपये किलो आहे.
◼️ खासगी संघ घेते ३६ रुपये लिटरने गाय दूध राज्यातील खासगी दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. दुधाला प्रतिलिटर ३६ रुपये दर देत आहे. सहकारी दूध संघ मात्र ३४ रुपयांनी खरेदी करतो.
◼️ साधारणतः १५ डिसेंबरपासून दुधाच्या उत्पादनात वाढ होणार असून, त्यानंतर दूध खरेदी दरात घसरण होऊ शकते; पण गेल्या वर्षी एवढी घसरण नसणार हे निश्चित आहे.
१०० लिटर दुधापासून किती पावडर व किती बटर तयार होते?
म्हैस
बटर - ७.५०० किलो.
पावडर - ९ किलो.
गाय
बटर - ४.२५० किलो.
पावडर - ८.५०० किलो.
अधिक वाचा: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवसुली संदर्भात शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय
