उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना आहार, निवारा, आरोग्य व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
रोजच्या दुधाचे प्रमाण व दुधाची प्रत टिकून राहील. सध्या उन्हाळी हंगाम असुन काही ठिकाणी उष्मा खूप वाढला आहे अशावेळी जनावरांना गोठ्यात सुसह्य वाटावे यासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी काय उपयोजना कराव्यात.
- उन्हाळ्यात जनावरांना हवेशीर गोठ्यात किंवा झाडाच्या दाट सावलीखाली बांधावे.
- गोठ्याची उंची भरपुर असावी जेणेकरुन गोठ्यात मोकळी हवा राहिल.
- गोठ्याच्या छतासाठी सीमेंटचे पत्रे असणे केव्हाही चांगलेच, स्टीलचे पत्रे असतील तर त्यावर गवत अंथरावे. गोठ्याचा रंग पांढरा असावा.
- गाठ्याभोवती दाट सावली देणारी झाडे लावावीत, त्यामुळे उन्हाळ्यातील गरम वाऱ्यापासून जनावरांचे संरक्षण होईल.
- जनावरांना गोठ्यात दाटीवाटीने बांधू नये, त्यांना सर्व हालचाली आरामशीरपणे करता याव्यात याची काळजी घ्यावी.
- जास्त उष्णता असल्यास गोठ्यामध्ये पंखे, शॉवर्स यांचा वापर करता येईल.
- तापमान वाढल्यास छतावर पसरलेल्या गवतावर पाणी शिंपडावे. गोठ्याच्या खिडक्यांना बारदाना बांधुन तो पाणी शिंपडून ओला ठेवावा.
- चाऱ्याकरिता गव्हाणीचाच वापर करावा जेणेकरुन चारा खराब होणार नाही.
- गोठ्यामध्ये जनावरांची गर्दी करू नये.
- जनावरांना चाऱ्याबरोबर गोठ्यात २४ तास स्वच्छ व ताजे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.
- टंचाईच्या काळात त्यांना भरपूर पाणी पाजावे. साधारणपणे जनावरांना ४० ते ५० लिटर पाणी दररोज पिण्यासाठी लागते.
- तसेच दुधाळ जनावरांना १ लिटर दुध तयार होण्यासाठी अतिरिक्त ४ लिटर पाण्याची गरज असते. त्यानुसार जनावरांचे पाणी व्यवस्थापन करावे.
- उन्हाळ्यात गोचीड, उवा यासारख्या बाह्यपरोपजीवीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यासाठी जनावरांच्या अंगावर व गोठ्यात किटकनाशकाची फवारणी करावी.
पशुपालकांनी उन्हाळ्यात हवेशीर गोठा, मुबलक हिरवा चारा, खुराकाचे नियोजन, स्वच्छ पाणीपुरवठा या बाबींचा अवलंब करावा. जेणेकरून दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन टिकून राहते तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहील.
अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी दिवसाला किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? वाचा सविस्तर