राजाराम लोंढे
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे गट वाटप योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार ५०० अर्ज अन् निधी मात्र दोनशे लाभार्थ्यांसाठी अशी अवस्था झाली आहे. या योजनेत कोल्हापूरचा पहिल्यांदाच समावेश केल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.
दूध उत्पादनास चालना देण्यासाठी या योजनेंतर्गत दोन देशी / संकरित गायी किंवा म्हशींचे गट वाटप केले जाते. यापूर्वी मराठवाड्यासाठी ही योजना होती. यंदा कोल्हापूरचा नव्याने समावेश केल्यानंतर जिल्ह्यातून हजारो अर्ज आले. मात्र लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
लोकसंख्येनुसार निधी
जिल्ह्यात सर्वसाधारण प्रवर्ग व मागासवर्गीय लोकसंख्या किती? यावरच शासन या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देते. त्यातही २०२१-२२ पासून आलेले अर्ज, त्यातून पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार होते. या यादीतून वर्षाला सुमारे दोनशे कमी होतात. त्यामुळे विलंब होत आहे.
'विशेष घटक'ची यादी पुढील आठवड्यात
जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष घटक योजनेच्या माध्यमातून दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जाते. त्यांच्या लाभार्थ्यांची यादी पुढील आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी दीडशे ते दोनशे दुधाळ जनावरांच्या गटासाठी निधी येतो. पण, इच्छुक शेतकऱ्यांचे प्रस्ताव अधिक असल्याने दूध उत्पादकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. - एम. एस. शेजाळ, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर.
काय आहे दुधाळ जनावरांचे गट
• सर्वसाधारण प्रवर्ग
दोन म्हैस/गाय वाटप - ५० टक्के अनुदान
शेळी गट वाटप ५० टक्के अनुदान
• मागासवर्गीय प्रवर्ग
दोन म्हैस/गाय वाटप - ७५ टक्के अनुदान
शेळी गट वाटप - ७५ टक्के अनुदान
निधी कमी असल्याने पशुपालकांना प्रतीक्षा करत बसावे लागते. शासनाने मागणीचा विचार करून निधी द्यावा. - बाळासाहेब पाटील, पशुपालक, हालेवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर.
हेही वाचा : करटुले शेती का आहे शेतकऱ्यांसाठी नफा देणारी? जाणून घ्या संधी आणि फायदे