कोल्हापूर : 'गोकुळ' दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त तब्बल १३६ कोटी ३ लाख रुपये फरक दिला आहे.
ही रक्कम आज, बुधवारी दूध संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हैस उत्पादकांना प्रतिलिटर २.४५, तर गाय दूध उत्पादकांना १.४५ रुपये फरक मिळणार आहे. आतापर्यंतचा हा उच्चांकी दूध फरक असून, पहाटेपासून शेणामुतात राबणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ही दसरा दिवाळी भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, प्रा. किसन चौगले, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, सुजीत मिणचेकर, एस. आर. पाटील, रणजीतसिंह पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.
संघाचा अंतिम दूध दरफरकाची तुलनात्मक माहिती
तपशील | २०२३-२४ (कोटीत) | २०२४-२५ (कोटीत) | गतसालापेक्षा जास्त (कोटीत) |
अंतिम दूध दरफरक | ११३.६६ | १३६.०३ | २२.३७ |
दूध दरफरक (रोखीने) | ९३.३२ | १११.५१ | १८.१९ |
दरफरक वरील व्याज (६%) | ३.२० | ५.५२ | २.३२ |
डिबेंचर्स व्याज (७.८०%) | ८.९६ | १०.६७ | १.७१ |
डिव्हिडंड (११%) | ८.१६ | ८.३८ | ०.२२ |
वार्षिक उलाढाल | ३,६७० | ३,९६६ | २९६ |
व्यापारी नफा | २०८.०४ | २१५.८७ | ७.८३ |
ठेवी | २४८.३० | ५१२.५२ | २६४.२२ |
दूध दरवाढीसह जादा ७८ कोटी शेतकऱ्यांच्या पदरात
◼️ 'गोकुळ'ने जानेवारी २०२५ पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली. त्यानंतर २५ मार्चला गाय दूध खरेदी दरात २, तर २९ ऑगस्टला गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रत्येकी १ रुपयाची वाढ केली.
◼️ या माध्यमातून जवळपास ६७ कोटी २० लाख तर हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त जादा ११ कोटी ६८ लाख, असे सुमारे ७८ कोटी ८४ लाख रुपये दूध उत्पादकांना जादाचे दिले आहेत.
अधिक वाचा: यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली; गाळप कधी सुरु होणार? उसाला किती दर देणार?