व्दिदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा व्दिदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते.
ओट चारा पिकाचे फायदे
◼️ ओट हे गव्हासारखे दिसणारे परंतु गव्हापेक्षा थोडे उंच वाढणारे आणि भरपूर फुटवे असणारे एकदलवर्गीय चारा पीक आहे.
◼️ ओट हे उत्पादनक्षम, पोषक असून त्याचा वापर हिरवा चारा व भुसा अशा प्रकाराने करता येतो.
◼️ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असून खोडदेखील रसाळ व लुसलुशीत असते.
◼️ त्यामुळे जनावरे या पिकाचा जवळजवळ सर्वच भाग आवडीने खातात.
◼️ दुभत्या जनावरांना हा चारा दिल्यास दुधाच्या उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय दुधातील स्निग्धांश वाढण्यासही मदत होते.
◼️ ओटच्या चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
लागवडीसाठी आवश्यक हवामान व जमीन
◼️ थंड व दमट हवामान ओटच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
◼️ पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन ओटच्या वाढीसाठी उत्तम मानली जाते.
पुर्वमशागत
◼️ पेरणीपुर्वी एकदा नांगरणी व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
◼️ पुर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे.
वाण, बीजप्रक्रिया व पेरणी
◼️ पेरणीसाठी फुले हरिता (बहु कापणीसाठी), फुले सुरभी किंवा केंट (एक कापणीसाठी) या सुधारीत जातींचे हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.
◼️ पेरणीपुर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू सवंर्धकाची बीज प्रकिया करावी.
◼️ साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दोन ओळीत ३० सेंमी अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी.
खत व्यवस्थापन
◼️ ओट चारा पिकासाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
◼️ यापैकी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावा.
◼️ तर उर्वरीत ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ दिवसांनी व ४० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रति हेक्टरी द्यावे.
तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन
◼️ तण नियंत्रणासाठी साधारणपणे २५ ते ३० दिवसात खुरपणी करावी.
◼️ आवश्यकतेनुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
कापणी व उत्पादन
◼️ पहिली कापणी ५० दिवसांत व दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी अथवा ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना करावी.
◼️ हिरव्या चाऱ्याकरिता पिकाची कापणी जमिनीपासून १० सेंमी उंचीवर करावी.
◼️ हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन दोन कापण्यांद्वारे मिळते.
अधिक वाचा: ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची नवी संधी; शेणापासून लाकूड निर्मिती उद्योग, जाणून घ्या सविस्तर