जागतिक तापमानवाढ ही आता केवळ वैज्ञानिक चर्चेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचे गंभीर परिणाम प्रत्यक्ष शेती आणि पशुपालन क्षेत्रावर दिसून येत आहेत. वाढते तापमान, उष्ण व दमट हवामान आणि लांबणारा उन्हाळा यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
विशेषतः दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध उत्पादन घटणे, प्रजनन क्षमता कमी होणे आणि जनावरांच्या आरोग्याच्या समस्या अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे भविष्यातील पशुपालन टिकवण्यासाठी “उष्णता सहनशील गाई” निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. सध्या जगभरात जनुकीय आधारावर उष्णता सहन करणारे पशुधन विकसित करण्याचे संशोधन वेगाने सुरू आहे.
अमेरिकेतील संशोधकांनी दक्षिण अमेरिकेतील सेनेपोल, कॅरोरा आणि लिमोनेरो या जातींचा अभ्यास करून त्यांच्यात “स्लिक जीन” नावाचे विशेष जनुक आढळून आणले.
या जनुकामुळे गाईंची त्वचा अधिक उष्णता बाहेर टाकू शकते आणि त्यामुळे त्या प्रचंड उष्ण हवामानातही आरामदायक राहतात. पाश्चात्य देशांनी हे जनुक होल्स्टन फ्रिजियन आणि जर्सी सारख्या जास्त दूध देणाऱ्या गाईंमध्ये हस्तांतरित करून उष्णता सहनशील दुग्धजन्य गाई विकसित केल्या आहेत.
आपल्या देशातही उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते आणि मे महिन्यात ते ४० ते ४३ अंशांपर्यंत जाते. ही परिस्थिती आता अपवादात्मक न राहता सामान्य होत चालली आहे.
अशा वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम दुग्धजन्य जनावरांवर होतो. गाईंना माणसांप्रमाणे शरीरातील उष्णतेचे नियमन प्रभावीपणे करता येत नाही. त्यांच्या शरीरात घामाच्या ग्रंथी कमी प्रमाणात असल्याने त्या धापा टाकून व तोंडाने श्वास घेऊन शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात.
रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटात सतत किण्वन प्रक्रिया सुरू असते. या प्रक्रियेतून अतिरिक्त उष्णता निर्माण होत असल्याने उन्हाळ्यात त्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो.
साधारणपणे ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सलग काही तास राहिल्यास जनावरे धापा टाकतात, तोंडाने श्वास घेतात, लाळ गळू लागते आणि पाण्यासाठी अस्वस्थ होतात.
श्वासोच्छ्वासाचा दर प्रति मिनिट १०० पर्यंत वाढू शकतो. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडते, पचनक्रिया मंदावते आणि दूध उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट होते.
दुधातील फॅट आणि एसएनएफचे प्रमाण कमी होते. स्तनदाह, माज न येणे आणि तात्पुरते वंध्यत्व यांसारख्या समस्या वाढतात. परिणामी पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
या परिस्थितीत योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांना चांगला हवेशीर निवारा, पुरेशा प्रमाणात थंड पाणी आणि सावली उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गोठ्यात पंखे, स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचन यंत्रणा बसवल्यास वातावरण थंड राहण्यास मदत होते.
स्प्रिंकलर आणि पंखे एकत्र चालवल्यास ओल्या त्वचेवरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन जनावरांना मोठा आराम मिळतो. उन्हाळ्यात कमी तंतुमय व सहज पचणारे खाद्य द्यावे. वैरण आणि पशुखाद्य शक्यतो रात्रीच्या थंड वेळेत द्यावे.
दर्जेदार खनिज मिश्रणाचा वापर करणेही फायदेशीर ठरते. गोठ्याभोवती शेडनेट किंवा ओले बारदाने लावल्यास गरम हवा आत येण्याचे प्रमाण कमी होते.
मात्र व्यवस्थापनातील बदलांबरोबरच दीर्घकालीन उपाय म्हणून उष्णता सहनशील जनुकीय गुणधर्म असलेल्या गाईंची निवड आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातच अशा गाई शोधून त्यांचे जनुकीय विश्लेषण केल्यास परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही.
महाराष्ट्रातील संगमनेर येथील प्रयोगशाळेचे संचालक डॉ. संदीप काळे यांनी उष्णता सहनशील वनस्पतींवर संशोधन करून जनुकीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. त्याच धर्तीवर गाईंमध्येही उष्णता सहनशील जनुकांचा शोध सुरू आहे.
मुंबई गौरक्षक मंडळाच्या सहकार्याने २०२५-२६ मध्ये अशा गाई शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत सहभागी पशुपालकांना प्रोत्साहनपर पुरस्कारही जाहीर करण्यात आले.
अत्यंत सोप्या पद्धतीने रक्त आणि केसांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. फक्त फिल्टर पेपरवर रक्ताचा एक थेंब आणि काही केसांचे नमुने पाठवून जनुकीय तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत २५१ गाईंची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ११ गाई स्लिक जीन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. फलटण तालुक्यातील रेवाडी गावातील भाऊसाहेब होळकर यांच्या गाईमध्ये हा विशेष जनुक प्रकार आढळला असून ती गाय तीव्र उन्हाळ्यातही दररोज ३४ लिटर दूध देत आहे.
तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील सुनील शिंदे यांच्या गाईमध्येही अशाच प्रकारची क्षमता आढळून आली आहे. या पशुपालकांचा गौरवही करण्यात आला.
भविष्यात अशा गाई आणि वळूंची मोठ्या प्रमाणावर तपासणी करून त्यांचा प्रजनन कार्यक्रमात वापर करण्याचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारात उष्णता सहनशील आणि चांगले दूध उत्पादन देणाऱ्या गाई निर्माण करता येतील.
सध्या २० लिटरपेक्षा अधिक दूध देणाऱ्या आणि उष्णतेचा कमी परिणाम होणाऱ्या गाईंची माहिती संकलित करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप सुरू करण्यात आला आहे.
संदीप काळे यांच्या या ७५८८००४६८० ग्रुपवर गायीचे चित्र आणि लहान व्हिडिओ त्यांच्या नाव आणि संपर्क क्रमांकासह शेअर करू शकतात. त्याची तपासणी व खात्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या पत्त्यावर सॅम्पलिंग किट पाठवले जाईल. विशेष म्हणजे या तपासणीसाठी कोणतेही प्रयोगशाळा शुल्क आकारले जात नाही.
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास महाराष्ट्रासह देशातील दुग्ध व्यवसायाला नवी दिशा मिळू शकते. उष्णतेमुळे होणारे नुकसान कमी होईल, दूध उत्पादन टिकून राहील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
भविष्यातील हवामान बदलांचा सामना करण्यासाठी 'उष्णता सहनशील गाई' निर्माण करणे हे केवळ संशोधनाचे काम नसून देशाच्या अन्नसुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
- डॉ. अब्दुल समद
माजी सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई
9969 371 999
- डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: डोंगर फोडून ४ वर्षांत साडेतीन किलोमीटरचा रस्ता केला; वाचा साताऱ्याच्या दशरथ मांझीची कहाणी
