समीर देशपांडे
कोल्हापूर : ब्राझील आणि अमेरिकेतील जातिवंत बैल आणि रेड्याचे रेतन वापरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यात पैदास वाढवण्याची योजना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने आखली आहे.
केवळ ५० रुपयांमध्ये हे रेतन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. रेडी किंवा पाडी होण्याचीच ९५ टक्के शक्यता असलेली ही रेतमात्रा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सध्या राज्यभर महाराष्ट्र पशूधन विकास मंडळ नागपूर आणि गोठित रेतमात्र प्रयोगशाळा पुणे यांच्याकडून कृत्रिम रेतनासाठी रेतमात्रा पुरवठा करण्यात येतो.
परंतु, यामध्ये कालवड, रेडी होण्याचे प्रमाण तुलनेत कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यामुळेच एकूणच राज्याचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी राज्य शासनाने अमेरिकेतील एका कंपनीशी करार केला आहे.
या कंपनीकडून ब्राझील, अमेरिकेसारख्या काही प्रमुख देशातून दर्जेदार बैल आणि रेड्यांच्या वीर्याद्वारे रेतमात्रा विकसित केली आहे. त्याचा पुरवठा आता राज्यभरात सुरू होणार आहे.
रेडी किंवा पाडी होण्याची ९५ टक्के लिंगनिश्चिती असलेली ही रेतमात्रा असून, याची बाजारातील किंमत १४०० ते १५०० रुपये आहे. मात्र, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने केवळ ५० रुपयांमध्ये ही रेतमात्रा देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेकडे दरवर्षी १ लाख रेतमात्रांची मागणी असते. यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी केले.
दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत असून, जिल्हा नियोजन समितीतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेद्वारे दूध उत्पन्नात वाढ करणे अपेक्षित आहे. - कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
अधिक वाचा: अचानक पडणाऱ्या विजांपासून कसे कराल जनावरांचे संरक्षण; जाणून घ्या सविस्तर