मोडनिंब: येथील आठवडा बाजारात शनिवारी संकरित गायींच्या किमती घसरल्या तर म्हशींच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. ढवळ्या गायीबाजारात आल्याने संकरित गायींच्या किमती घसरल्याचे बाजारात सांगितले जात आहे.
मोडनिंब येथे दर शनिवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो. या बाजारात माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, माढा तालुक्यांतून जनावरे ही खरेदी-विक्रीसाठी दाखल होतात. काही शेतकरी गाई, म्हशी सर्वाधिक घेऊन येतात.
येथे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली जनावरे ही व्यापारी सांगोला आठवडा बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. कधी-कधी मोडनिंब आठवडा बाजारात जनावरांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
माझ्याकडे दोन संकरित गायी आहेत. या उत्तम प्रकारच्या गायींना ७० ते ७५ हजार रुपयांच्या वर दर मागितला जात नसल्यामुळे या गायीचे दर कोसळले आहेत. एक लाखापेक्षा जास्त किमतीला विकली जाणारी जनावरं ही ७० ते ८० हजारात सुद्धा विकली जात नाहीत. - लहू गायकवाड, पशुपालक, करकंब, ता. पंढरपूर
मागणी वाढल्याने म्हशीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. ७० हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत म्हशीची विक्री होत आहे. यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. नदीकाठचा पूरग्रस्त भाग वगळता अन्यत्र जनावरांना चारा मुबलक उपलब्ध आहे. - भारत चव्हाण, पशुपालक, जाधववाडी
अधिक वाचा: तुकडेबंदी कायदा रद्द झाला पण अध्यादेश कधी? कायद्यात सुधारणा करावी लागणार का? वाचा सविस्तर