विजय सरवदे
पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच १२३ पशुवैद्यकीय दवाखान्यांना 'अ' दर्जा देण्यात आला आहे.
तसेच, जिल्हा नियोजन समितीने पशुवैद्यकीय आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निधीतून लवकरच नवीन इमारतींचे बांधकाम, डागडुजी, संगणकीकरण आणि उपकरणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात राज्य शासन अंगीकृत ३९ आणि जिल्हा परिषदेचे ८४, असे एकूण १२३ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत होते. यापैकी जि.प. पशुसंवर्धन विभागाचे श्रेणी 'अ' ३८, तर ४६ दवाखाने श्रेणी 'ब' दर्जाचे होते. नवीन पुनर्रचनेत शासनाने सर्वच दवाखाने श्रेणी 'अ'चे केले असून त्याद्वारे दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यापैकी सध्या जिल्ह्यातील ४ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती जीर्ण, धोकादायक तर काही पत्र्यांच्या होत्या. त्यात कन्नड तालुक्यातील नागद, वैजापूर तालुक्यांतील सावखेड गंगा आणि सिल्लोड तालुक्यातील भराडी व पानवडोद येथील इमारती पाहून तिथे नवीन सुसज्ज इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. शिवाय, वैजापूर, गंगापूर, कन्नड व खुलताबाद येथील ९ दवाखान्यांच्या इमारतींची डागडुजी, संरक्षण भिंती उभारण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील २२ दवाखान्यांसाठी सुसज्ज इमारती नाहीत, तर काही दवाखान्यांना स्वतःची जागा नसल्यामुळे तिथे नवीन कामे प्रस्तावित करण्यास प्रशासनाला अडचण येत आहे. जागेची जशी उपलब्धतता होईल, त्यानुसार नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
३५ दवाखान्यांना संगणक
• केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुवैद्यकीय सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून ३५ दवाखान्यांना संगणक पुरविले जाणार आहेत.
• यामुळे उपचार नोंदी, औषधींचा साठा, लसीकरण मोहीम आणि प्राण्यांच्या रोगनिदानाची माहिती ऑनलाइन राहील. याच निधीतून पशुरुग्णांस हाताळण्यासाठी तांत्रिक उपकरणे देखील खरेदी केली जाणार आहेत.
३ कोटी रुपयांचा निधी
रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने पशुवैद्यकीय आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मंजूर केला असून, या निधीतून लवकरच नवीन इमारतींचे बांधकाम, डागडुजी, संगणकीकरण आणि उपकरणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दर्जेदार व जलद सेवा
पशुपालकांना तत्काळ आणि दर्जेदार उपचार सेवा मिळाव्यात, यासाठी शासनाने पशुसंवर्धन विभागाचे पुनर्रचना धोरण स्वीकारले आहे. या निर्णयामुळे पशुधनाचे आरोग्य, उत्पादकता आणि पशुपालकांचे आर्थिक स्थैर्य यावर थेट सकारात्मक परिणाम होईल. संगणकीकरणामुळे उपचार व्यवस्थेत पारदर्शकता येईल. - डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन.
