गरिबांच्या ताटातील भाकरी आज श्रीमंतांचे मुख्य अन्न म्हणून मिरवत आहे. ज्वारीतील पोषणमुल्यामुळे भाकरीला जेवणात मानाचे स्थान मिळत आहे. भाकरी बनविण्याच्या उद्योगातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे (शाळू) कोठार म्हटले जाते. अनेक दशकांपासून ज्वारीच्या भाकरीकडे गरिबांचे खाद्य म्हणून बघितले जाते. या गरिबांच्या भाकरीला आता व्यावसायिक स्वरूप मिळाले आहे.
दररोजच्या जेवणात असणारी गरम भाकरी ही जास्त दिवस टिकत नाही; पण बरेच दिवस टिकणाऱ्या सोलापुरी कडक भाकरीने बाजारपेठ काबीज केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यासह देशभरात या भाकरीला मागणी वाढल्याने याची आता कोट्यवधींची उलाढाल होत आहे. तसेच विदेशातही या भाकरीची निर्यात होऊ लागली आहे.
सोलापूर शहरात तेलुगु आणि कन्नड भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळेच या शहराला बहुभाषिक शहर असे म्हटले जाते. अनेक वर्षांपासून राहत असलेल्या बहुभाषिक नागरिकांमुळे शहराच्या संस्कृतीमध्येही त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. अन त्याचा प्रभाव खाद्यसंस्कृतीवरही उमटला आहे.
सोलापूरची कडक भाकरी ही जगप्रसिद्ध झाली आहे. अनेक दिवस टिकणाऱ्या या भाकरीबद्दल सर्वांनाच कुतुहल आहे. सोलापूर शहरातील एका फाउंडेशनने नुकतीच राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत साडेचारशे महिलांनी सहभाग घेतला होता.
भाकरीला नवी ओळख मिळावी, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी रोजी कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम येथे महासंस्कृती महोत्सव होणार आहे. तेथे ही भाकरी देण्यात येणार आहे, असे स्पर्धेचे आयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी सांगितले.
किराणा दुकानापासून सुप्रसिद्ध मॉलमध्येही भाकरी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ लागली. त्यामुळे राज्यभरातून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात भाकरी खरेदी करतात.
हाताच्या भाकरीला चव
वाढत्या व्यवसायामुळे अनेक गृहउद्योग समूहाने कडक भाकरी बनविण्याचे मशीन घेतले आहे. त्यामुळे देश-विदेशात मागणीनुसार पुरवठा शक्य झाला आहे; परंतु मशीनपेक्षा हाताच्या भाकरीलाच ग्राहकांची अधिक मागणी आहे.
दुकानात मिळते भाकरी
सुरुवातीला ही भाकरी सोलापूर शहरातील काही गृहउद्योगांतच मिळत असे. किंवा मागणी केल्यानंतर घरपोच केली जात. जसजसा उद्योग भरभराटीस येऊ लागला तसे अनेक गृहउद्योगांनी हा व्यवसाय सुरू केला.
प्रदेशनिहाय भाकरीचे स्वरूप
● ज्वारी, बाजरी, रागी, नवणे आणि मकासारख्या भरडधान्याची भाकरी केली जाते. कोकणात तांदळाची भाकरी केली जाते. कोल्हापुरात तांदूळ आणि ज्वारी मिक्स केलेली भाकरी असते.
● सोलापूर, सांगलीमध्ये ज्वारीची भाकरी पातळ असते. तर मराठवाड्यात ती जाड असते. खान्देशात बाजरीच्या भाकरीला मान आहे. दक्षिण कर्नाटकात रागीच्या तुलनेत उत्तर कर्नाटकात ज्वारीची भाकरी मुख्य मेनू आहे.
● विजापूर, कलबुर्गी या जिल्ह्यामध्ये मशीनद्वारे रोज हजारो कडक भाकरी तयार करणारे उद्योग यशस्वी होत आहेत. बदललेल्या 'डाएट'चा परिणामही आरोग्यावर झाल्याचे दिसून येत असल्याने भाकरीतील पोषण मूल्यांची नव्याने चर्चा होताना दिसते.
● भाकरी आणि चुलीवरचे जेवण या क्रेझमुळे स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सीमावर्ती संस्कृतीचे अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी सांगितले.
भाकरी बनविण्याची देशातील पहिलीच स्पर्धा
● लोकांमध्ये ज्वारीची भाकरी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. बेकारी व बेकरीपासून मुक्तीसाठी भाकरी उद्योग वाढावा, यासाठी भाकरी बनविण्याची एक आगळीवेगळी स्पर्धा देशात पहिल्यांदाच सोलापुरात घेतली गेली. या स्पर्धेतून ३७५ महिलांनी तब्बल १७,००० भाकरी बनविल्या आहेत.
● राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र, जुळे सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत महिलांना बक्षीस, साडी, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत १५ वर्षांची मुलगी ते ७२ वर्षांची आजी सहभागी झाली होती.
गरम भाकरीला मागणी
१) ताज्या गरम भाकरीला बाजारात मोठी मागणी आहे; परंतु ती तयार करण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे यामध्ये अनेक अडचणी येतात. गरम भाकरी शक्यतो ढाबे आणि हॉटेलमध्ये उपलब्ध होते.
२) यावर उपाय म्हणून भविष्यात सोलापूरमध्ये ५० ठिकाणी गरम भाकरी व भाजी केंद्र काढण्यात येणार आहेत. एका केंद्रात रोज २० भाकरी विक्री करण्याचे नियोजन केले आहे. यातून एका महिलेस दररोज किमान ५०० ते ७०० रुपये मिळणार आहेत.
३) सोलापुरात ढाबे, हॉटेल, किराणा दुकानात गरम व कडक भाकरी मिळते. लग्नसमारंभ, बारसे, स्नेहसंमेलनात कडक भाकरी व शेंगांच्या चटणीला मागणी वाढली आहे.
यशवंत गव्हाणे
वरिष्ठ उपसंपादक, कोल्हापूर