सभांच्या मैदानांसाठी दमछाक, न्यायालयासह आयोगाचे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:05 AM2019-04-17T01:05:46+5:302019-04-17T01:06:08+5:30

निवडणुकीत यापूर्वी ठाण्यात सहज मैदान, रस्ते उपलब्ध होत होते. परंतु, आता कायदेशीर निर्बंध आल्याने मैदाने सभांसाठी मिळणे मुश्कील झाले आहे.

Tension for the meetings, commission restrictions with the court | सभांच्या मैदानांसाठी दमछाक, न्यायालयासह आयोगाचे निर्बंध

सभांच्या मैदानांसाठी दमछाक, न्यायालयासह आयोगाचे निर्बंध

Next

अजित मांडके 

ठाणे : निवडणुकीत यापूर्वी ठाण्यात सहज मैदान, रस्ते उपलब्ध होत होते. परंतु, आता कायदेशीर निर्बंध आल्याने मैदाने सभांसाठी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सभा घ्यायच्या तरी कुठे, असा प्रश्न शिवसेना, राष्टÑवादी आणि मनसेला पडला आहे. परिणामी निवडणूक विभागाकडे सभांसाठी परवानगी मागण्यासाठीचा एकही अर्ज दाखल झालेला नसून, सभांच्या तारखाही मागेपुढे केल्या जात आहेत. शेवटची सभा आपल्याच नेत्याची व्हावी, यासाठी शिवसेनेचा गनिमी कावा सुरू आहे. परंतु, मैदान नाही, रस्ता नाही, मग ती घ्यायची कुठे, असा पेच सर्वच पक्षांतील मंडळींना सतावत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात सभा घेण्याचे नियोजन सर्वच पक्षांकडून सुरू आहे. परंतु, स्थानिक पातळीवर या नेत्यांच्या सभांसाठी ठिकाण कोणते निश्चित करावे, असा पेच सध्या सतावू लागला आहे. यापूर्वी सभा घ्यायची झाली, तर त्यासाठी सेंट्रल मैदान हे निश्चित मानले जात होते. त्यावर यापूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, मायावती अशा प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सभा गाजल्या आहेत. परंतु, सेंट्रल मैदान हे सभांसाठी देण्यात येऊ नये, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. दुसरीकडे गावदेवी मैदानाचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित केला असून, शिवाजी मैदान हे लहान आहे. त्यामुळे सभा घ्यायची झाली, तर थेट ढोकाळी येथील हायलॅण्ड भागाशिवाय पर्याय नाही. परंतु, ते आडबाजूला असल्याने तिथे सभा घेण्यास प्रमुख पक्ष इच्छुक नाहीत.
महापालिकेच्या निवडणुकीवेळी गडकरी रंगायतनसमोरील रस्त्यांवर विविध नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. परंतु, त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे सांगण्यात आल्याने रस्त्यांवर सभा घेण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता सभा घ्यायची कुठे, असा पेच या मंडळींना सतावू लागला आहे. त्यामुळे सभांसाठी ठिकाण कोणते घ्यावे, कोणत्या ठिकाणी सभा घेतल्यास कार्यकर्ते जास्तीच्या संख्येने गर्दी करू शकतात, अशा मध्यवर्ती ठिकाणांचा शोध सुरू आहे.
>‘रेमण्ड’च्या मैदानावर नजर
शहराच्या मध्यवर्ती भागात आता रेमण्डची मोकळी जागा शिल्लक आहे. त्याठिकाणी सभा घेता येऊ शकते का, याची चाचपणी आता विविध पक्षांकडून सुरू झाली आहे. परंतु, हे मैदान सेंट्रल मैदानापेक्षा मोठे आहे. सेंट्रल मैदानात एका वेळी ४५०० ते ५००० खुर्च्या लावल्या जाऊ शकतात, तसेच आजूबाजूला कार्यकर्ते उभे राहून सभा ऐकू शकतात, एवढी या मैदानाची क्षमता आहे. त्यामुळे हे मैदान भरवणे शिवसेना किंवा मनसेला सहज शक्य होते. रेमण्डच्या मैदानाची क्षमता ही साधारणपणे २५ हजार खुर्च्यांची असून कार्यकर्त्यांंची एवढी गर्दी कशी जमवायची, असाही पेच प्रमुख पक्षांना सतावत आहे. तरीसुद्धा, शिवसेना आणि मनसेकडून या मैदानासाठी चाचपणी सुरू आहे. परंतु, आधी मनसेची सभा झाली की, मग शेवटचा षटकार मारण्याचा विचार शिवसेनेचा आहे. त्यामुळेच आधीच्या तारखेत बदल करण्याचा विचारसुद्धा शिवसेनेकडून सुरू आहे.
>मतदारसंघात शेवटची सभा शिवसेनेचीच
निवडणुका म्हटले की, सभा आल्याच. त्याच माध्यमातून आपण मतदारांपर्यंत जाऊ शकतो, असे प्रमुख पक्षांचे मत आहे. त्यामुळेच ठाणे लोकसभा मतदारसंघात शेवटची सभा आपल्याच नेत्याची व्हावी, यासाठी तीनही प्रमुख पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, मनसेकडून २४ आणि २५ एप्रिल या तारखांची चाचपणी सुरूआहे. शिवसेनेकडून आधी २३ एप्रिल ही तारीख अंतिम करण्यात आली होती.
आता आपल्या नेत्याची सभा ही शेवटच्या दिवशीच व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असून त्यानुसार २४ ते २७ एप्रिलदरम्यानच्या तारखेचा विचार आहे.
विशेष म्हणजे शिवसेना आणि मनसे हे दोघेही आता रेमण्डच्या मैदानासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्टÑवादीकडून २२, २५ आणि २६ एप्रिलपैकी एका तारखेसाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप तारीख अंतिम झालेली नाही. त्यांच्याकडून शिवाजी मैदानासोबत गडकरी रंगायतनसमोरील रस्त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Web Title: Tension for the meetings, commission restrictions with the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.