मोदींकडे विकासाचे मुद्देच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:03 AM2019-04-08T00:03:26+5:302019-04-08T00:03:52+5:30

ठाणे लोकसभेचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी रविवारी वाशीत राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

Modi does not have any developmental issues | मोदींकडे विकासाचे मुद्देच नाहीत

मोदींकडे विकासाचे मुद्देच नाहीत

googlenewsNext

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या विकासाचे मुद्दे नसल्याने हिंदुत्वाचा आधार घेतला जात असल्याची टीका माजी मंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. त्यावरून वर्धा येथील मोदींचे हिंदुत्वावरील भाषण म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला चिकणचा प्रसाद ठेवल्यासारखे होते, असेही ते म्हणाले. तर छगन भुजबळ यांच्यावर सरकारने केलेल्या अन्यायाबाबत असंतोष व्यक्त करत, ‘हिम्मत असेल तर माझी चौकशी लावा’ असेही आव्हान मुख्यमंत्र्यांना केले.


ठाणे लोकसभेचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी रविवारी वाशीत राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री गणेश नाईक यांनी सेना-भाजपवर सडकून टीका केली. मागील लोकसभेपूर्वी केलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. शिवाय मोदींकडे प्रगतीचे मुद्देही नसल्याने हिंदुत्वाचा आधार घेऊन अपयश लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचीही टीका त्यांनी केली. मोदी हे देशाचे नेतृत्व करत आहेत की केवळ गुजरातचे, याबाबतही शंका उपस्थित केली.


चार वर्षांत शिवसेना व भाजपचा वाद म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचे चित्र तयार केले जात होते. मात्र, तेच प्रतिशिवाजी महाराज व अफजल खान आता एकमेकांना मिठ्या मारत आहेत. त्यामुळे यांचा धर्म खरा की खोटा, याबाबत शंका असल्याचीही टीका त्यांनी केली. तर सरकारच्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला पहिल्यांदा आपण विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनीही विरोध दर्शवला. मात्र, शिवसेनेच्या प्रतिशिवाजीला तीन दिवसांनी जाग आल्याचाही टोला त्यांनी मारला.


सध्या नेहरू आणि गांधी घराण्याला बदनाम करण्याचे काम भाजप सरकार करत आहे, त्याकरिता वड्रांसारखी प्रकरणे बाहेर काढून जनतेमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचाही आरोप केला. राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा ते परदेशात असतानाही चौकशीला सामोरे जायला परत आले. या वेळी सरकारने त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टीने न पाहता सूडबुद्धीने त्रास देण्याचे काम केले; परंतु मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर माझी चौकशी लावून दाखवा, असे आव्हानही नाईक यांनी केले. या वेळी कार्यक्रमास लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे, काँग्रेसचे निरीक्षक तारीख फारुखी, महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माधुरी सुतार, अनिल कौशिक, नीला लिमये आदी उपस्थित होते.

सोमय्यांची अवस्था डेंगळेंसारखी : ब्रिटिशांविरोधात पेशव्यांनी पुकारलेल्या युद्धात त्रिंबक डेंगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. कालांतराने पेशव्यांसाठीच त्यांना ब्रिटिशांना शरण जावे लागले. सध्या अशीच अवस्था किरीट सोमय्या यांची झाली असल्याची टीका गणेश नाईक यांनी केली. सोमय्या यांनीही सरकारच्या सांगण्यावर अनेकांची प्रकरणे बाहेर काढली. मात्र, ऐन वेळी सोमय्या यांनाच सरकारला शरण जावे लागले. यावरून नाईक यांनी किरीट सोमय्या यांची तुलना डेंगळे यांच्या परिस्थितीशी केली.

रघुराम राजन देशाचे भावी अर्थमंत्री : गरिबांना प्रति वर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने त्यांच्या घोषणापत्रात केली आहे. या संकल्पनेमागे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री गणेश नाईक यांनी केला. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर राजन हे देशाचे अर्थमंत्री होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले. तर यंदा मोदींचा पराभव निश्चित असून, यानंतर त्यांना इतर मोदींप्रमाणे नेपाळ मार्गे विदेशात पळ काढावा लागेल असा टोलाही गणेश नाईक
यांनी मारला.

‘राफेल’सारखाच ‘जेट’ घोटाळा
सरकारने तोट्यात असलेली खासगी जेट कंपनी ८५ हजार कोटींना विकत घेतली. राफेल सारखाच सरकारचा हा दुसरा घोटाळा ठरणार आहे. हा घोटाळा बाहेर काढण्याचे काम आपण करणार असल्याचेही गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Web Title: Modi does not have any developmental issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thane-pcठाणे