'काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:42 AM2019-04-26T04:42:47+5:302019-04-26T04:43:30+5:30

काँग्रेसचे घोषणापत्र हा देशातील जनतेला असेच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. त्या व्यक्तीप्रमाणेच कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

'Congress's manifesto is a loan repayment by selling a chicken' | 'काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा'

'काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा'

Next

भिवंडी/डोंबिवली : एका व्यक्तीवर एक लाखाचे कर्ज होते. ते फेडण्याकरिता त्याने चार कोंबड्या खरेदी केल्या. त्यांच्यापासून चार अंडी मिळाली. त्यांची पिले वाढत जाऊन पसारा वाढल्यावर ६४० कोंबड्या विकून एक लाखाचे कर्ज फेडणार, अशी स्वप्ने त्या व्यक्तीने पाहिली. काँग्रेसचे घोषणापत्र हा देशातील जनतेला असेच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. त्या व्यक्तीप्रमाणेच कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कामतघर येथील मोतीराम काटेकर मैदानात सायंकाळी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ डोंबिवलीतील फडके रोड येथे सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना आ. रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, महेश चौगुले, कुणबीसेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसची आश्वासने ही केवळ उधारीची आहेत. त्यातून कोणाला काही अद्याप मिळालेले नाही आणि काही मिळणारसुद्धा नाही. लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील निवडून आले की नाही, मी मुख्यमंत्री राहिलो की नाही, या गोष्टीला मी फारसे महत्त्व देत नाही. पण, हा देश राहिला पाहिजे. हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदींचे हात बळकट केले पाहिजेत. त्यासाठी पाटील यांना मतदान करून संसदेत पाठवले पाहिजे. तरच, मोदी देशाचे पंतप्रधान होतील, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकारने पाच वर्षांत कोट्यवधी जनतेची विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा सामान्यांना फायदा झालेला आहे.

ही निवडणूक काँग्रेस सरकारचा ६० वर्षांचा अनाचारी कार्यकाल विरुद्ध मोदींची विकासाची पाच वर्षे असा आहे. त्यामुळे जनतेने विकासाला मत द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यापूर्वीचे काँग्रेस सरकार हे फुसके सरकार होते. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याविषयी अमेरिकेत जाऊन रडत होते. मात्र, मोदी सरकारने पाकिस्तानवर दोन वेळा सर्जिकल स्ट्राइक करून जगाला दाखवून दिले की, भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर तुमची दशा होईल. तसेच दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत भारताच्या विरोधात बरळणाऱ्यांना १२४ (अ) हे देशद्रोहाचे कलम लावणाºया भाजपवर काँग्रेस टीका करत आहे. काँग्रेसचे राहुल गांधी देशाविरोधात कृती करणाºयांसाठी असलेले घटनेतील १२४ (अ) हे देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देत आहेत. याचा जनतेने विचार करावा, असे फडणवीस यांनी सांगितले.

भिवंडी मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार यापूर्वी पाच वर्षे खासदार होते. त्यांनी पाच वर्षात केलेले एकही उल्लेखनीय काम सांगण्यासारखे नाही. मात्र, पाटील यांनी पाच वर्षात भिवंडी मतदारसंघात २७ हजार कोटींची विकासकामे मंजूर केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टोरंटबाबात नंतर तोडगा काढू
भिवंडीतील टोरंट या खाजगी वीजकंपनीकडून व्यापारी, यंत्रमागधारक व सामान्यांना जो जाच केला, त्यासंदर्भात आचारसंहिता संपताच लवकर एक बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढला जाईल. तसेच भिवंडी ही पॉवरलूमची नगरी आहे. ५६ हॉर्सपॉवर क्षमता असलेल्या पॉवरलूमला ज्या सुविधा दिल्या आहेत, त्या सुविधा ४० हॉर्सपॉवर क्षमतेच्या पॉवरलूमला दिल्या जाव्यात, ही येथील कारखानदारांची मागणी आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने आता त्याविषयी मी काही आश्वासन देणार नाही. पण, आचारसंहिता संपताच त्यावरही विचारविनिमय करून तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी भिवंडीकरांना आश्वासित केले.

भिवंडी शहरात मिश्र स्वरूपाचे मतदार आहे. त्यातही हिंदी भाषिक उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार आहे. या मतदाराला डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे संपूर्ण भाषण हिंदीतून केले. त्यांच्या भाषणाआधी उमेदवार कपिल पाटील यांनीही हिंदी भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. सभा सुरू होण्यापूर्वी हवेत पांढरी कमळे सोडण्यात आली. त्याकडे उपस्थितांचे लक्ष आकर्षित झाले होते.

बीएनएन कॉलेजमध्ये आज बीकॉम परीक्षेचा पेपर होता. पेपर सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. घामाघूम होऊन पेपर द्यावा लागला. महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावरील सभास्थानी मुख्यमंत्री येणार असल्याने तर वीजपुरवठा खंडित केला नाही ना, असे आश्चर्य व्यक्त केले गेले.

भाजपमध्ये रंगले मानापमान नाट्य
डोंबिवलीतील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेत व्यासपीठावर कोणी बसायचे, यावरून भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगले.
पक्षाचे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर यांनी व्यासपीठावर बसणाऱ्या भाजप नेत्यांची नावे दिली, त्यामध्ये भाजपचे गटनेते विकास म्हात्रे यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. अखेरीस म्हात्रे काही व्यासपीठावर आले नाहीत. भाजप सरचिटणीस नंदू परब, रविसिंग ठाकूर यांनी बिडवाडकर यांच्या नावे निश्चित करण्याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयातून व्यासपीठावर बसणाऱ्यांची नावे निश्चित केली गेल्याचे बिडवाडकर यांनी सांगितले.

Web Title: 'Congress's manifesto is a loan repayment by selling a chicken'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.