बाउन्सर्स आवडे नेताजींना, सहा तासांचे मिळतात दोन हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:23 AM2019-04-14T01:23:01+5:302019-04-14T01:23:43+5:30

आपल्या सभोवताली खाजगी रक्षक (बाउन्सर्स) चा ताफा घेऊन फिरू लागल्याने सध्या बाउन्सर्सची मागणी तुफान वाढली आहे.

Bouncer Netaji, gets 6 hours to get two thousand rupees | बाउन्सर्स आवडे नेताजींना, सहा तासांचे मिळतात दोन हजार रुपये

बाउन्सर्स आवडे नेताजींना, सहा तासांचे मिळतात दोन हजार रुपये

Next

- सचिन सागरे

कल्याण : लोकसभा निवडणूक काळात अनेक छोटेमोठे नेते, पक्षाचे पदाधिकारी आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले जावे म्हणून आपल्या सभोवताली खाजगी रक्षक (बाउन्सर्स) चा ताफा घेऊन फिरू लागल्याने सध्या बाउन्सर्सची मागणी तुफान वाढली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये बाउन्सर्स बाळगण्याची क्रेझ अगोदरपासून आहे. त्यात निवडणूक असल्याने काही नेत्यांनी महिनाभराकरिता पीळदार शरीर असलेले काळ्या कपड्यांतील बाउन्सर्स घेऊन प्रचार, मिरवणुका, मेळावे यामध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. लोकांना हात जोडून नमस्कार करत एसयूव्ही मोटारीतून उतरून बाउन्सर्सच्या ताफ्यात सभास्थानी किंवा प्रचारफेरीच्या ठिकाणी आले की, हे कोण नेताजी आले, हे पाहण्याकरिता लोकांच्या माना वळतात. त्यामुळे या लक्षवेधीकरिता खिशाला खार लावायला काही स्वयंघोषित नेते तयार झाले आहेत. अनेक कलाकारही आपल्यासोबत बाउन्सर्स बाळगतात. काळे टी-शर्ट, जीन्स किंवा सफारीमध्ये दिसणारे बाउन्सर्स त्यांच्या पीळदार शरीरयष्टीबरोबरच सोबत कमरेला ‘सामान’ लावून असल्याने गर्दीत लक्ष वेधून घेतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व तत्सम नेत्यांना एसपीजी सुरक्षा असते. एकसारखे ब्लेझर परिधान केलेले हे अधिकारी त्यांच्या अवतीभोवती असतात. त्यांच्या या सुरक्षा व्यवस्थेने अनेक राजकीय नेत्यांना भुरळ पाडली असून त्याच धर्तीवरील बाउन्सर्सची राजकीय नेत्यांमधील क्रेझ वाढली आहे. केडीएमसीच्या बैठकीला तर अनेक नगरसेवक आपल्यासोबत दोनदोन गाड्यांमधून बाउन्सर्स व आपण पोसलेली तगडी पोरं घेऊन येतात. काहीवेळा या बाउन्सर्सने हातघाईवर येण्याचे प्रसंग घडले आहेत.
आकर्षक शरीरयष्टी आणि लक्षवेधी चेहरा हेच या बाउन्सर्सचे मुख्य भांडवल आहे. त्यामुळे ते जपण्यासाठी त्यांची शर्थ असते. बाउन्सर्स दिवसभरात चार ते पाच तास व्यायाम करतात. व्यायाम केल्यानंतर त्यांच्याकरिता पौष्टिक आहार घेणे ही गरज असते. त्यामुळे काहीजण पार्टटाइम बाउन्सर्सचे काम करतात. सध्या अनेक कॉर्पोरेट्स, बँका, मोबाइल कंपन्यांची कार्यालये, मॉल, पब्ज, डान्स बार, आॅर्केस्ट्रा बार येथे खासगी अंगरक्षक नेमण्यावर भर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ‘बाउन्सर्स’ची मागणी वाढली आहे. सध्या निवडणुकीत ती शिगेला पोहोचली आहे.
>निवडणुकीमुळे अंगरक्षकांचे वधारले भाव
बाउन्सर्सचे कामाचे तास ठरलेले असून सहा तासांकरिता एका बाउन्सर्ससाठी लग्नसराईत दीड हजार रुपये घेतले जातात. सध्या राजकीय मेळावे, प्रचारसभांमध्ये मिरवण्याकरिता बाउन्सर्स लागत असल्याने बाउन्सर्सचे दर वाढून दोन हजार रुपये झाले आहेत. सहा तासांपेक्षा जास्त तास काम करायचे असल्यास त्याचा मोबदला वेगळा घेतला जातो. तसेच, त्यांच्या पौष्टिक जेवणाची व्यवस्था करावी लागते.
>कोण आहेत
यात काम करणारे?
जिम इन्स्ट्रक्टर, सुशिक्षित बेरोजगार तरुण, तसेच पूर्णवेळ रोजगार नसलेले या क्षेत्राकडे आकर्षित होतात. बाउन्सर्सचे काम करणाऱ्याकडे उत्तम शारीरिक तंदुरुस्ती, स्मार्ट चेहरा, उत्तम अ‍ॅटिट्यूड आणि नजरेत जरब या गोष्टी असायला हव्यात. बाउन्सर्सचे काम करणाºयाची शिफ्ट ड्युटी करण्याची तयारी हवी. बाउन्सर्सना काही वेळा सलग सहा तास न बसता काम करावे लागते.
>संरक्षणाची जबाबदारी महत्त्वाची
बाउन्सर्सचे मुख्य काम राजकीय नेते, सेलिब्रेटी अथवा श्रीमंत व्यक्तींच्या सभोवती हाताचे कडे करून त्यांचे गर्दीपासून रक्षण करणे, हे आहे. ज्या व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. तिच्यासोबत त्यांना सतत वावरावे लागते. काहीवेळा चाय से किटली गरम या नात्याने सेलिबे्रटींच्या सोबत असलेले बाउन्सर्स हे लोकांना धक्काबुक्की करतात, ढकलतात किंवा मारहाण करतात. विशेषकरून मीडिया आणि बाउन्सर्स यांच्यात हातघाईवर येण्याचे प्रसंग काहीवेळा घडतात.
>मराठी तरूणांसह उत्तर भारतीयांचाही भरणा
अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी आणि श्रीमंत व्यक्तींच्या आसपास असणारे बाउन्सर्स हे फिजिकल सिक्युरिटी या प्रकारात मोडतात. एखादी व्यक्ती, संस्था किंवा इव्हेंटच्या सुरक्षेची जबाबदारी या बाउन्सर्सवर असते. सरकारी पातळीवर ही सुरक्षा पुरवणाºया संस्था नसल्या, तरी अनेक खासगी संस्थांमार्फत कंत्राटी पद्धतीने बाउन्सर्स पुरवले जातात. यामध्ये बहुतांश तरुण हे मराठी किंवा उत्तर भारतीय आहेत.
>आमच्याकडे ५० बाउन्सर्सचा ग्रुप आहे. आवश्यकता असते त्यानुसार आम्ही बाउन्सर्स पुरवतो. बाउन्सर्सचे महत्त्वाचे काम असते ते म्हणजे नेते, सेलिब्रेटी यांच्या दिशेने येणारी गर्दी सांभाळणे. एक बाउन्सर सहा तास काम करतो, त्या कामाचे आम्ही दीड ते दोन हजार रुपये आकारतो. लग्नसोहळे, राजकीय मेळावे, कार्यालये तसेच इतर ठिकाणी बाउन्सर्सचा पुरवठा करतो.
-विशाल म्हस्के,
बाउन्सर्सचा पुरवठादार

Web Title: Bouncer Netaji, gets 6 hours to get two thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.