मनसेचे वैभव खेडेकर म्हणतात ‘टिकटिक वाजते डोक्यात’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:34 AM2019-04-04T02:34:47+5:302019-04-04T02:35:09+5:30

मनसेचा उत्तर रत्नागिरीचा मेळावा : राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत सूचक विधान

Vaibhav Khedekar of MNS says, 'Tick at the head' | मनसेचे वैभव खेडेकर म्हणतात ‘टिकटिक वाजते डोक्यात’

मनसेचे वैभव खेडेकर म्हणतात ‘टिकटिक वाजते डोक्यात’

googlenewsNext

खेड : मनसेमध्येच घटक पक्षाला जिंकून द्यायची व समोरच्याचा पराभव करण्याची हिंमत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले. शहरातील द. ग. तटकरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी वैभव खेडेकर यांनी ‘टिकटिक वाजते डोक्यात... धडधड वाढतेय मनात...’ अशी सुरुवात करून मनसे कोणत्या पक्षाला सहकार्य करणार हेच सूचित केले.

खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण व गुहागर या पाच तालुक्यांतील अध्यक्षांसह, अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मनसेप्रेमी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, आजही राज ठाकरे व तुमच्या आमच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. आपण ज्यांच्या बाजूने असू, त्यांचा विजय निश्चित आहे. पक्ष वाढविताना पैसे, गाड्या लागतात; पण हे आणायचे कुठून, अशा कठीण प्रसंगात वाटचाल केली म्हणूनच आज दखल घेण्यास आम्ही पात्र ठरलो. आपल्यासारखे कार्यकर्ते असतील तर राज ठाकरे यांना काहीही फरक पडणार नाही. आज मनसेतून अन्यत्र गेलेल्याची स्थिती काय आहे हे सर्वच जाणत आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीही सुरुवातीला असाच निर्णय घेऊन जनसंघाला पाठिंबा न देता काँग्रेसला दिला होता. याची आठवण करून दिली.
या वेळी विधानसभेतील संख्याबळ निश्चित वाढणार आहे आणि येत्या ६ एप्रिल रोजीच्या गुढीपाडवा मेळाव्यात होणाऱ्या राजकीय भूकंपाचे तुम्हा-आम्हाला सर्वांना साक्षीदार व्हायचे आहे. त्यामुळे या गुढीपाडवा मेळाव्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विरोधकांनी पक्षप्रवेश पैसे देऊन केले; पण आमचे पक्षप्रवेश राजवरील प्रेमापोटी होत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुंबईची पार्सले मुंबईला पाठविण्याची व्यवस्था आपण आतापासूनच केली पाहिजे, असे वैभव खेडेकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. सूत्रसंचालन अमोल मोरे यांनी केले.
 

Web Title: Vaibhav Khedekar of MNS says, 'Tick at the head'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.