दिंडोरीत माकपच्या उमेदवारीचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:04 AM2019-04-27T05:04:42+5:302019-04-27T05:05:31+5:30

युती-आघाडीकडून आयात उमेदवार; राजी-नाराजीचा दोघांनाही फटका

Who is the benefactor of CPI (M) candidate in Dindori? | दिंडोरीत माकपच्या उमेदवारीचा फायदा कोणाला?

दिंडोरीत माकपच्या उमेदवारीचा फायदा कोणाला?

googlenewsNext

- श्याम बागुल

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत देत असलेल्या युती व आघाडीने आयात उमेदवारांनाच संधी दिल्याने दोन्ही पक्षांना राजी-नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्यात माकपने उमेदवारी जाहीर करून दोन्ही पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. माकपची उमेदवारी नेमकी कोणाला तारते आणि कोणाला मारते यावरच युती व आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

आदिवासी व बिगर आदिवासी मतदारांचा समावेश असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी गेल्या निवडणुकीत भाजपविरुद्ध लढणाऱ्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्टÑवादीने डॉ. भारती पवार यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली.

ज्याप्रमाणे भाजपने उमेदवार बदलल्यामुळे नाराजीची भावना आहे, त्याचप्रमाणे, राष्टÑवादीमध्येदेखील आयात उमेदवारामुळे नाराजी बोलून दाखविली जात आहे. नेमका त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांनी चालविला आहे.
आदिवासी कोकणा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातील प्रमुख तिन्ही उमेदवार त्याच समाजातील आहेत, शिवाय तिघांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. डॉ. भारती पवार यांचे सासरे दिवंगत ए. टी. पवार हे आठ वेळा आमदार राहिले आहेत. तर धनराज महाले
यांचे वडील दिवंगत हरिभाऊ महाले हे तीन वेळा खासदार व दोन वेळा आमदार राहिले आहेत. जिवा पांडू गावित सात वेळा सुरगाणा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार राजकीयदृष्ट्या ताकदीचे असल्याने कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आघाडीसाठी शरद पवार तसेच माकपासाठी सीताराम येचुरी यांची सभा या मतदारसंघात झाली. माकपाने मतदारसंघात जागर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली आहे. प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत असली, तरी कोण कोणाची मते खातो, यावर गणिते अवलंबून आहे. तूर्त प्रत्येकाची लढाई जिंकण्यासाठी व प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी आहे.

गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घरोघरी स्वच्छतागृह उभारण्यास प्रोत्साहन देऊन माता, भगिनींची अब्रू वाचविली. शेतमालाला भाव व शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. आयुष्यमान योजनेने गरिबांचा उपचार खर्च उचलला.
- डॉ. भारती पवार, भाजप

सर्वच पातळीवर सरकार अयशस्वी ठरले. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट नोटबंदी, जीएसटीने जनता, शेतकºयांची फसवणूक केली. बेरोजगारी वाढविली. फसवे सरकार गेले पाहिजे.
- धनराज महाले, राष्टÑवादी

कळीचे मुद्दे
शेतमालाचे कोसळलेले भाव, गुजरातला वाहून जाणारे पाणी
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भाजपच्या मदतीविषयी साशंकता, कॉँग्रेस कार्यकर्ते प्रचारापासून दूर

Web Title: Who is the benefactor of CPI (M) candidate in Dindori?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.