The euphemism of 470 brilliant collapses | ईव्हीएमच्या ४७० पेट्यांची कुलुपे तोडण्याची नामुष्की
ईव्हीएमच्या ४७० पेट्यांची कुलुपे तोडण्याची नामुष्की

यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर इव्हीएम लोखंडी पेट्यांमध्ये ठेवले गेले. मात्र, कुलुपांच्या चाव्या मॅच न झाल्याने अखेर या ४७० पेट्यांची कुलुपे फोडण्याची नामुष्की यंत्रणेवर आली. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील या घोळामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद, कारंजा, वाशिम या सहा विधानसभा क्षेत्रांत ११ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळात मतदान पार पडले. यानंतर, इव्हीएम असलेल्या या सर्व पेट्या शक्य तेवढ्या लवकर यवतमाळातील दारव्हारोड स्थित स्ट्राँग रूममध्ये (शासकीय गोदाम) आणल्या जात होत्या. सर्वात प्रथम कारंजा मतदारसंघाचे इव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पोहोचले. तेथील आरओ व तहसीलदारांच्या अनुभवाचे हे फलित मानले जाते, याउलट यवतमाळचे इव्हीएम पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगितले जाते. हे इव्हीएम सकाळी ४ वाजता पोहोचल्याची माहिती आहे. खरा गोंधळ उडाला तो राळेगाव विधानसभा मतदारसंघात. प्रत्येक पेटीत दहा इव्हीएम याप्रमाणे या पेट्या यवतमाळच्या स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. एकूण ४७० इव्हीएम असल्याचे सांगितले जाते. या पेट्या आणण्यास आधीच विलंब झाला. त्यात चाव्यांचा गोंधळ घातला गेला. पेट्या आणल्यानंतर त्या हस्तांतरित करताना कुण्या पेटीत कोणत्या क्रमांकाचे इव्हीएम आहे, याची खातरजमा केली जाणार होती. पेट्यांना कुलुपे लावण्यात आली. मात्र, त्याची चावी त्याला बांधण्यात आली नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. प्रत्येक कुलुपाला उपलब्ध सर्व चाव्या लाऊन पाहताना शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. ४७० कुलुपे उघडण्यासाठी एवढ्या चाव्या लाऊन पाहिल्यास दोन दिवस लागतील, याचा अंदाज आल्याने अखेर ही कुलुपे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्यानुसार बहुतांश पेट्यांची कुलुपे तोडून तेथे नवी कुलुपे आणण्यात आली. या गोंधळामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जाम संतापल्याचे सांगितले जाते. या गोंधळामागे आरओ व तहसीलदारांचा कमी पडलेला निवडणुकीचा अनुभव हे प्रमुख कारण सांगितले जाते. तरीही कळंब तहसीलदारांच्या समयसूचकतेमुळे बराच गोंधळ कमी होण्यास मदत झाल्याचीही महसूल यंत्रणेत चर्चा आहे. कुलुपे फोडावी लागण्याच्या या प्रकाराबाबत महसूल यंत्रणेत प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे.
>कुलुपांसाठी रात्री २ वाजता उघडले दुकान
प्रत्येक लोखंडी पेटीत राळेगाव विधानसभा क्षेत्रातील दहा इव्हीएम ठेवण्यात आले. या पेट्यांसाठी कुलुपेच आणली नसल्याचे रात्री २ वाजता लक्षात आले. राळेगावातील एका दुकानदाराला रात्री २-३ वाजता उठवून असतील तेवढी सर्व कुलुपे आणण्यास सांगण्यात आले. अखेर पहाटे ४ वाजता कुलुपे लावून पेट्या रवाना करण्यात आल्या. पेट्या येण्यास लागलेल्या विलंबामागे १६ टेबलचा नियम कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अन्य मतदारसंघात हा नियम बाजूला ठेऊन परंपरागत पद्धतीने काम केल्याने इव्हीएम पेट्या लवकर स्ट्राँग रूमवर पोहोचल्याचे कळते. दरम्यान, राळेगाव येथील आरओ, तसेच यवतमाळच्या निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.


Web Title: The euphemism of 470 brilliant collapses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.