भाजपाच्या १९५ च्या यादीत केवळ एकमेव मुस्लीम उमेदवार; कोण आहेत अब्दुल सलाम..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:26 PM2024-03-06T15:26:07+5:302024-03-06T15:35:16+5:30

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या पहिल्या यादीत केरळमधून डॉ. अब्दुल सलाम यांना तिकीट दिले आहे. भाजपाकडून तिकीट मिळालेले ते एकमेव मुस्लिम आहेत. तेव्हापासून अब्दुल सलाम सातत्याने चर्चेत आहेत.

केरळमध्ये भाजपाने लोकसभेच्या २० पैकी १२ जागांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये मलप्पुरममधून डॉ.अब्दुल सलाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलाम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे चाहते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत. सलाम हे कालिकत विद्यापीठाच्या कुलगुरू राहिलेले आहेत. डॉ.अब्दुल सलाम हे केरळमधील तिरूरचे रहिवासी आहेत.

माहितीनुसार, २०१८ पर्यंत, त्यांनी जैविक विज्ञानातील १५३ शोधनिबंध, १५ समीक्षा लेख आणि १३ पुस्तके प्रकाशित केली आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते पक्षात सक्रिय आहेत. अब्दुल सलाम यांनी २०११ ते २०१५ पर्यंत कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले.

सलाम यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. अब्दुल सलाम हे देखील भाजपाच्या केंद्रीय टीमचा एक भाग आहेत. त्यांच्याकडे भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. डॉ अब्दुल सलाम तिरुवनंतपुरममध्ये राहतात

कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले अब्दुल सलाम यांना मृदा व्यवस्थापनातील तज्ञ मानले जाते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. पक्षाने २०२४ मध्ये ४०० पार करण्याचं मिशन हाती घेतलं आहे.

मलप्पुरमच्या पोटनिवडणुकीत भाजपाने एपी अब्दुल्लाकुट्टी यांना तिकीट दिले आहे. आता पक्षाने अब्दुल सलाम यांना सार्वत्रिक निवडणुकीत उतरवले आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) ला २०१९ आणि २०२१ च्या पोटनिवडणुकीत मध्ये या जागेवर विजय मिळवला होता. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपा तिसऱ्या क्रमांकावर होता. २००९ पासून ही जागा आययूएमएलच्या ताब्यात आहे.

भाजपाने यापूर्वी २०१६ मध्ये तिरूर विधानसभा मतदारसंघातून सलाम यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर सलाम यांना केवळ ९०९७ (5.33 टक्के) मते मिळाली. आता तब्बल सात वर्षांनंतर पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे.

अब्दुल सलाम मलप्पुरमच्या जागेवर गेम चेंजर ठरू शकतील, अशी भाजपला आशा आहे. या जागेवर मुस्लिम मतदारांचे वर्चस्व आहे. अब्दुल सलाम यांना रिंगणात उतरवून भाजपाने काँग्रेसप्रणित यूडीएफला थेट आव्हान दिले आहे. सध्या आययूएमएलचे मोहम्मद बशीर येथून खासदार आहेत.

अब्दुल सलाम अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. ७१ वर्षीय अब्दुल सलाम यांना नऊ भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, शाळेत शिकत असताना ते ९ किलोमीटर चालत असे. पंतप्रधान मोदींच्या प्रभावामुळे ते भाजपात आले. ती एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी मला मोहित केले आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याप्रमाणेच सलाम यांची पुरोगामी विचारसरणी आहे. ते यापूर्वी मुल्ला, मुफ्ती आणि मौलाना यांच्यावर टीका करत होते.