विराट कोहलीला सात विक्रमांची संधी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेत विश्रांती देण्यात आलेला विराट कोहली या मालिकेतून पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. या मालिकेत विराटला सात विक्रम खुणावत आहेत. त्यामुळे त्याची बॅट पुन्हा तळपलेली पाहायला चाहते आतुर आहेत.

विराट कोहलीच्या नावावर 58 आंतरराष्ट्रीय शतकं जमा आहेत. त्याने वन डेत 35 शतकं आणि कसोटीत 25 शतकं झळकावली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध दोन शतक झळकावल्यास तो 60 आंतरराष्ट्रीय शतकं करणारा पाचवा फलंदाज ठरेल. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( 100), रिकी पाँटिंग (71), कुमार संगकारा (63) आणि जॅक कॅलिस (62) आघाडीवर आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेत विराटची बॅट चांगलीच तळपल्यास तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी येऊ शकतो. त्यासाठी त्याला वेस्ट इंडिजविरुद्घच्या या मालिकेत पाच शतकी खेळी करावी लागतील.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 58 डावांत विराटच्या नावावर 2102 धावा आहेत. त्याला ट्वेंटी-20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर नोंदवण्यासाठी 169 धावा हव्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 38 धावा करताच तो दुसऱ्या स्थानी झेप घेईल.

वन डे क्रिकेटमध्ये 10000 धावांचा पल्ला गाठण्याची विराटला संधी आहे. त्यासाठी त्याला वेस्ट इंडिजविरुद्घच्या पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ 221 धावा कराव्या लागतील.

त्याने या वन डे मालिकेत 221 धावा केल्या तर 10000 धावा करणारा सर्वात वेगवान खेळाडूचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल. हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने 259 डावांत ही पल्ला सर केला होता, तर विराटने 208 डावांत 9779 धावा केल्या आहेत.

कसोटी मालिकेत दोन शतक झळकावताच 25 कसोटी शतकं करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरू शकतो. तसेच सर्वात जलद 25 कसोटी शतकं झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरू शकतो. हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी 66 डावांमध्ये 25 शतकं केली होती.

विराटने आत्तापर्यंत विविध मालिकांमध्ये 14 वेळा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला तीन मालिकावीराचा पुरस्कार मिळवण्याची संधी आहे. जर त्याने दोन पुरस्कार मिळवले तर सर्वाधिक मालिकावीर मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानी झेप घेईल.