भारतीय संघाची विक्रमी कामगिरी

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटीही तिसऱ्या दिवशी खिशात घातली. भारताने हा सामना 10 विकेट राखून जिंकताना मालिकेत 2-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले.

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 311 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने 367 धावा उभ्या केल्या, परंतु विंडीजचा दुसरा डाव 127 धावांवर गडगडला आणि भारताने विजयासाठीचे 72 धावांचे लक्ष्य सहज पार केले.

युवा सलामीवीर पृथ्वी शॉने (33*) विजयी धाव घेतली. भारताकडून विजयी धाव घेणारा पृथ्वी हा सर्वात युवा खेळाडू ठरला. 18 वर्षे 339 दिवसांच्या पृथ्वीने देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर विजयी चौकार लगावला.

भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा सलग दहा कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी पहिल्यांदाच विंडीजवर दहा विकेट राखून विजय मिळवला आहे.

गोलंदाज उमेश यादवने विंडीजच्या संघाला दुसऱ्या डावात धक्के दिले. त्याने 88 धावा देताना सहा विकेट घेतल्या.

या विजयासह घरच्या मैदानावर सलग दहा कसोटी जिंकण्याचा विक्रमही भारताने नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियानंतरचा दुसरा संघ ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमेश यादवला प्रथमच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या कसोटीत एकूण दहा विकेट घेतल्या.

पदार्पणात शतक आणि दुसऱ्या कसोटीत 70 व नाबाद 33 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.