'या' दिग्गजांशी पृथ्वी करणार का बरोबरी...

मुंबईच्या पृथ्वी शॉ याने पदार्पणाच्या कसोटीत शतकी खेळी करत भारतीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले. ही शतकी खेळी साकारताना त्याने अनेक विक्रम मागे टाकले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावून त्याने दुसऱ्या सामन्यासाठी संघातील आपले स्थान मजबूत केले. हैदराबाद येथे मैदानात उतरल्यानंतर त्याला भारताच्या दिग्गज फलंदाजांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे लक्ष्य खुणावणार आहे.

18 वर्षीय पृथ्वीने राजकोट येथे खेळवण्यात आलेल्या कसोटीत पदार्पणातच 154 चेंडूंत 134 धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्याला सामनावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आले होते

भारताने हा सामना एक डाव व 272 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे.

हैदराबाद येथे खेळवण्यात येणाऱ्या या कसोटीत पृथ्वीला भारताच्या माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यासह सध्याचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

या तिघांनीही कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटींत शतकी खेळी साकारली आहे आणि पृथ्वीलाही हा पराक्रम करण्याची संधी आहे.

अझरुद्दीन याने 1984-85 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन कसोटींत अनुक्रमे 110 व 105 धावांची खेळी केली होती.

सौरव गांगुलीने 1996 मध्ये इंग्लंडविरुद्धच अनुक्रमे 131 व 136 धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 177 व नाबाद 111 धावा केल्या होत्या.