Number Game : ...म्हणून ऑस्ट्रेलियाला 'माही'ची धास्ती

भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या या पराभवाला उमेश यादवने अखेरच्या षटकात दिलेल्या 14 धावा आणि महेंद्रसिंग धोनीची संथ खेळीला जबाबदार धरण्यात आले. धोनीने निवृत्ती घ्यावी असा सल्लाही अनेकांनी दिला.

पण, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल कॅप्टन कूल माहीच्या बचावासाठी धावला. त्याने धोनीच्या खेळीची पाठराखण करताना परिस्थितीनुसारच धोनी खेळला असे मत व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची धोनीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्याला 16 डावांत 39च्या सरासरीनं 273 धावा करता आल्या आहेत आणि त्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट हा 106.64 असा आहे आणि कोणत्याही प्रतिस्पर्धीविरुद्धचा हा त्याचा नीचांक स्ट्राईक रेट आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवर मात्र धोनीचे आकडे सर्वांना थक्क करणारे आहेत. येथे त्याने 16 ट्वेंटी-20 डावांत 59.55च्या सरासरीने 536 धावा कुटल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

भारतातल्या स्टेडियमम्सपैकी चिन्नास्वामी येथे धोनीची बॅट सर्वात अधिक तळपली आहे. त्यानंतर चेपॉक येथे 49च्या सरासरीनं त्यानं 1238 धावा केल्या आहेत.

भारतीय संघ चिन्नास्वामी येथे 2017 मध्ये शेवटचा खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात धोनीनं 36 चेंडूंत 56 धावा चोपल्या होत्या.

धोनीनं येथे तीनच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 खेळले आणि त्यात त्यानं 35च्या सरासरीनं 70 धावा केल्या. या खेळपट्टीवर सर्वाधिक धावा करणाऱ्या सुरेश रैनाचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला 33 धावांची गरज आहे.