नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन! नितीन गडकरी-राजू पारवे यांनी भरला निवडणूक अर्ज

By योगेश पांडे | Published: March 27, 2024 01:14 PM2024-03-27T13:14:03+5:302024-03-27T13:15:31+5:30

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही होती उपस्थिती

NDA shows of strength in Nagpur as Nitin Gadkari Raju Parve files nomination for Lok Sabha Election 2024 | नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन! नितीन गडकरी-राजू पारवे यांनी भरला निवडणूक अर्ज

नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन! नितीन गडकरी-राजू पारवे यांनी भरला निवडणूक अर्ज

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी तर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आलेले राजू पारवे यांनी रामटेक मतदारसंघासाठी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. प्रफुल्ल पटेल हेदेखील उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी ‘रॅली’ काढत महायुतीतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

बुधवारी निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे महायुतीचे कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासूनच संविधान चौकात एकत्रित आले होते. सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास नितीन गडकरी व राजू पारवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने ‘रॅली’ सुरु झाली. एका ‘ओपन जीप’मध्ये गडकरी, पारवे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुलेखा कुंभारे, हेदेखील उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह गडकरी यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याअगोदर गडकरी व उपमुख्यमंत्र्यांनी संविधान चौकात छोटेखानी भाषण केले.

  • उपमुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्त्याचे दर्शन

गडकरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत होते. विशेष म्हणजे यावेळी सर्वांना मुख्यमंत्र्यांमधील सामान्य कार्यकर्तादेखील अनुभवता आला. त्यांनीदेखील गडकरी यांच्या समर्थनार्थ स्वत: घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ मग इतर कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्या.

  • जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट बंदोबस्त

गडकरी व पारवे यांच्यासमवेत अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरदेखील पोलीस तैनात होते. गडकरी, पारवे अर्ज भरत असताना बाहेर हजारो कार्यकर्ते उभे होते.

  • गडकरींचे कुटुंबीयदेखील जनतेसोबतच

महायुतीची ‘रॅली’ निघत असताना नितीन गडकरी यांचे कुटुंबिय हे कुठल्याही सुरक्षेविना सामान्य कार्यकर्त्यांसोबतच होते. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते पोहोचले. गडकरी अर्ज भरत असताना ते बाहेरच थांबले होते. गडकरी यांच्या पत्नी कांचन यांनी दोन्ही उमेदवारांचे निवासस्थानी औक्षण केले.

 

Web Title: NDA shows of strength in Nagpur as Nitin Gadkari Raju Parve files nomination for Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.