मुस्लिम, हलबा पट्ट्यात भरभरून मतदान, महालनेही कंबर कसली

By कमलेश वानखेडे | Published: April 26, 2024 06:01 PM2024-04-26T18:01:25+5:302024-04-26T18:03:15+5:30

Nagpur : नाईक तलाव, तांडापेठ, गोळीबार चौक आघाडीवर : मध्य नागपुरात काट्याच्या लढतीची चिन्हे

Muslim and Halba are voted in major number | मुस्लिम, हलबा पट्ट्यात भरभरून मतदान, महालनेही कंबर कसली

Nagpur Polling Booth

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मध्य नागपुरात ५४.०६ टक्के मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत येथील मुस्लिम, हलबा बहुल पट्ट्यात भरभरून मतदान झाले आहे. इतवारीतील व्यापाऱ्यांनीही मतदानात आघाडी घेतली तर महाल परिसरानेही मतदानाची सरासरी घसरू दिलेली नाही. त्यामुळे मध्य नागपुरातील लढाई काट्याची होण्याची चिन्हे आहेत.

मध्य नागपुरात ३०५ बूथवर मतदान झाले. यापैकी २८ बूथवर मतदानाचा ग्राफ वाढून ६० टक्क्यांवर मतदान झाले. ४५ बूथवरील मतदान ५० टक्क्यांखाली राहिले. तर ७ बूथ ४० टक्क्यांचा टप्पाही गाठू शकले नाहीत.


नाईक तलाव परिसरात बंपर मतदान झाले. या भागातील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मधील ८ बूथ वर सरासरी ६० टक्क्यांवर तर संत कबीर उच्च प्राथमिक शाळेतील चार बूथवर सरासरी ५० टक्के मतदान झाले आहे. या सर्व बूथवर सरासरी ५९ टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही शाळेच्या प्रत्येकी एका बूथवर ६५ टक्क्यांवर मतदान झाले आहे, हे विशेष.

तांडापेठच्या पंडित नेहरू कॉन्व्हेंटमधील दोन बूथ व मनपा वाचनालयाच्या बूथवरही सरासरी ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. येथील नवशक्ती उच्च प्राथमिक शाळेच्या सात बूथ वर सरासरी ६५.७४ टक्के मतदान झाले.
मेहंदीबागच्या मराठी प्राथमिक शाळेतील सहा बूथवर सरासरी ५५ टक्के मतदान झाले. तर खैरीपुरा येथील दयाराम वाडे हायस्कूलच्या पाच बूथवर सरासरी ५४.१८ टक्के मतदान झाले. गोळीबार चौक परिसरात सरासरी ५७ टक्के मतदान झाले. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेत चार बूथ होते. येथील दोन बूथवर तर ६० व ६२ टक्के मतदान झाले आहे.

भारत माता चौकातील जागनाथ मराठी प्राथमिक शाळेच्या दोन बूथवर सरासरी ५२ टक्क्यांवर मतदान झाले आहे. महालातील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. येथील बहुतांश बूथने ५५ टक्क्यांचा आकडा गाठला आहे. काही बूथवर तर ६० टक्क्यांवर मतदान झाले आहे.
भाऊजी दप्तरी शाळेतील बूथ क्रमांक २१६ वर ६३.७६ टक्के, बाबा नानक सिंधी हिंदी हायस्कूलच्या बूथवर सरासरी ६० टक्के, सी.पी. ॲण्ड बेरार हायस्कूलच्या बूथवरही सरासरी ५५ टक्यांवर मतदान झाले आहे. गणेशपेठेत काही भागात ५३ टक्के तर काही भागात ५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

राहतेकरवाडीतील बूथ नंबर १
राहतेकरवाडी येथील साने गुरुजी उर्दू प्राथमिक शाळेतील बूथ क्रमांक २७९ वर सर्वाधिक ८१.२९ टक्के मतदान झाले. येथे १२४० पैकी तब्बल १००८ मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला.


मोमीनपुरा, हंसापुरी, टीमकीतही मतदानाचा जोर

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मोमीनपुरा, हंसापुरी, टीमकी या भागातील मतदान केंद्रांवर यावेळी जोर दिसून आला. प्रत्येक बूथवर मतदानात वाढ झाली आहे. हंसापुरी हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या बूथ क्रमांक ६७ वर ६०.८९ टक्के मतदान झाले आहे. मोमीनपुरा येथील मजिदिया गर्ल्स हायस्कूलच्या बूथ क्रमांक ७० वर ६१.२६ टक्के, तर उर्दू उच्च प्राथमिक शाळा, मोहम्मद अली सराय येथील बूथ क्रमांक ७३ वर तब्बल ६२.२२ टक्के मतदान झाले आहे. अंसारनगर, बंगाली पंजा या भागात सरासरी ५२ टक्के मतदारांनी मतदान केले.

इतवारीतील व्यापारी सरसावले, गांधीबाग माघारले
इतवारी भागात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे. या भागातही समाधानकारक मतदान झाले. रामपेठ, क्वेटा कॉलनी येथील व्यापारी कुटुंबियांसह मतदानासाठी बाहेर पडले. इतवारीतील लाडपुरा प्राथमिक शाळेच्या बूथवर सरासरी ५५ टक्के, सी.ए. रोडवरील इतवारी हायस्कूलमध्ये सरासरी ५६ टक्के व रामपेठ, क्वेटा कॉलनी भागातही सरासरी ५५ टक्क्यांवर मतदान झाले आहे. गांधीबागेत मात्र अपेक्षित मतदान झाले नाही. गांधीबागेतील पन्नालाल देवडिया माध्यमिक शाळेतील दोन बूथ व मनपाच्या दाजी उच्च प्राथमिक शाळेच्या दोन बूथवर सरासरी ५१ टक्के मतदान झाले.


बजेरिया, भालदारपुरा, संत्रा मार्केटही मागे
बजेरिया, भालदारपुरा, संत्रा मार्केट या भागात अपेक्षेनुसार मतदान झाले नाही. भालदारपुऱ्यातील सर सय्यद अहमद खां वाचनालयातील बूथवर ५२ टक्के तर शब्बानी व्यायाम शाळेच्या बूथवर ४६ टक्के मतदान झाले. बजेरियातील सरस्वती तिवारी हिंदी मुलींच्या शाळेतील चार बूथवर सरासरी ५३ टक्के व संत्रा मार्केट परिसरातील चार बूथवर सरासरी ५० टक्के मतदान झाले आहे.
 

मेयोच्या चार बूथवर अत्यल्प मतदान

- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चार बूथवर अत्यल्प मतदान झाले. बूथ क्रमांक १०२ वर ३१.३६ टक्के, बूथ क्रमांक १०३ वर ३५ टक्के, बूथ क्रमांक १०४ वर २२.५८ टक्के व बूथ क्रमांक १०५ वर २८.४७ टक्के मतदान झाले.

 

Web Title: Muslim and Halba are voted in major number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.