लग्नसोहळ्याचे चांदीचे दागिने आचारसंहितेच्या कचाट्यात; हुपरीतील ६ हजार व्यावसायिक त्रस्त

By पोपट केशव पवार | Published: March 22, 2024 01:14 PM2024-03-22T13:14:48+5:302024-03-22T13:15:02+5:30

बिल दाखवूनही जप्त करतात माल

Wedding silver jewelry in the code of ethics; 6,000 businessmen in Hoopri are suffering | लग्नसोहळ्याचे चांदीचे दागिने आचारसंहितेच्या कचाट्यात; हुपरीतील ६ हजार व्यावसायिक त्रस्त

लग्नसोहळ्याचे चांदीचे दागिने आचारसंहितेच्या कचाट्यात; हुपरीतील ६ हजार व्यावसायिक त्रस्त

पोपट पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: चांदीच्या कलाकुसरीमुळे देशभर प्रसिद्ध असलेला हुपरी परिसरातील चांदी व्यवसाय ऐन लग्न सराईच्या काळातच आचारसंहितेमुळे अडचणीत आला आहे. हुपरी परिसरातून पाठविले जाणारे चांदीचे दागिने, त्यातून मिळणारे पैसे देशभरातील चेकपोस्टवर जप्त केले जात असल्याने सहा हजार उद्योजकांना बनवलेल्या चांदीचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे, बनवलेला माल परराज्यात पाठवणेच बंद केल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या४० हजार कामगारांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

हुपरी (ता. हातकणंगले) या परिसरात चांदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. चांदीचा व्यवसाय करणारे सहा हजार उद्योग या परिसरात आहेत. 

रोज तीन टन पैंजण

हुपरी परिसरात चांदीचे तीन टन पैंजण रोज बनविले जातात. हा माल देशभर पाठवला जातो. सध्या लग्नसराई सुरू आहे. पैंजणला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, याच काळात आचारसंहिता सुरू असल्याने माल पाठवण्यास उद्योजक घाबरत आहेत. मागणी असूनही माल पाठवता येत नसल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे.  

चेक पोस्टवर बिल दाखवूनही कारवाई

येथील सर्व माल बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थानसह देशभरात पाठवला जातो. परप्रांतात चांदीचे दागिने पुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या उद्योजकांकडे जातेवेळी तयार दागिने असतात, तर येतेवेळी चोख चांदी, कच्ची चांदी, चांदीची मोड तसेच काही रक्कम असते. आचारसंहितेमुळे प्रत्येक चेकपोस्टवर तपासणी होते. खरेदी - विक्री केल्याचे बिल असूनही चेकपोस्टवर चांदी व्यावसायिकांचा माल व पैसे जप्त केले जात आहेत.

हुपरीतून देशभरात चांदीचा माल पाठवला जातो. आचारसंहिता काळात या मालाची वाहतूक करताना उद्योजकांनी नेमकी कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत, याबाबत प्रशासनाने आम्हाला सांगावे.
-मोहन खोत, अध्यक्ष, चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी

चांदी व्यवसाय दृष्टिक्षेपात उद्योग - ६,०००
कामगार - ४०,०००

Web Title: Wedding silver jewelry in the code of ethics; 6,000 businessmen in Hoopri are suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.