Kolhapur: चौघेजण आधी बनले आमदार, नंतर पोहोचले थेट लोकसभेत 

By विश्वास पाटील | Published: April 22, 2024 04:53 PM2024-04-22T16:53:49+5:302024-04-22T16:54:33+5:30

जयवंतराव आवळे परजिल्ह्यांतून निवडून येणारे एकमेव खासदार 

Uday Singhrao Gaikwad, Sadashivrao Mandalik, Kallappanna Awade and Raju Shetty became MPs after becoming MLA In Kolhapur district | Kolhapur: चौघेजण आधी बनले आमदार, नंतर पोहोचले थेट लोकसभेत 

Kolhapur: चौघेजण आधी बनले आमदार, नंतर पोहोचले थेट लोकसभेत 

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत आतापर्यंत झालेल्या १७ निवडणुकांत आमदार झाल्यानंतर खासदार होण्याचे भाग्य चौघांना लाभले. त्यामध्ये उदयसिंहराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक, कल्लाप्पाण्णा आवाडे आणि राजू शेट्टी यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार होऊन लातूर राखीव मतदारसंघातून खासदार होण्याची संधी माजी खासदार जयवंतराव आवळे यांना मिळाली. परजिल्ह्यांतून निवडून येणारे ते तसे एकमेव खासदार आहेत. 

उदयसिंहराव गायकवाड हे १९७२ ला शाहूवाडी मतदारसंघातून नवकाँग्रेसमधून आमदार होते. त्या निवडणुकीत त्यांना एकूण मते ३६ हजार ९५३ पडली; परंतु त्यातील त्यांचे मताधिक्य होते; तब्बल २४ हजार ७०९. त्याच वर्षी सदाशिवराव मंडलिक कागलमधून अपक्ष म्हणून पहिल्यांदा १६२४ मतांनी आमदार झाले. गायकवाड १९७८ च्या निवडणुकीतही आमदार होते. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे हे १९८० च्या निवडणुकीत अर्स काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. शिरोळ मतदारसंघातून २००४ च्या निवडणुकीत राजू शेट्टी अपक्ष म्हणून विधानसभेला निवडून आले.

आमदार झाले; परंतु लोकसभा नाही..

विधानसभा लढवली त्यात यश मिळाले, आमदार म्हणूनही कारकिर्द गाजवली. उत्तम प्रतिमा, चांगले चारित्र्य असे सगळे पाठीशी असतानाही लोकसभेला मात्र त्यांना गुलाल मिळाला नाही, असेही काहीच्या बाबतीत घडले. त्यामध्ये शेका पक्षाचे चारित्र्यवान आमदार त्र्यंबक सीताराम कारखानीस, प्रा. एन. डी. पाटील, म्हसव्याचे काकासाहेब देसाई, जनता दलाचे लढाऊ नेते शंकर धोंडी पाटील, श्रीपतराव शिंदे, गोविंदराव कलिकते, के. एल. मलाबादे, अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, विक्रमसिंह घाटगे, संपतराव पवार यांचा समावेश होतो.

खासदार झाले; परंतु विधानसभा नाही

खासदार झाले; परंतु ज्यांना विधानसभेला लोकांनी निवडून दिले नाही, असेही काहींच्या बाबतीत घडले. त्यामध्ये एस. के. डिगे हे अगोदर करवीरमधून विधानसभेला पराभूत झाले आणि पुढच्याच १९५७ च्या निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून खासदार झाले. खासदार संजय मंडलिक यांनी २००९ ला कागल मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्याच निवडणुकीत धनंजय महाडिक यांनीही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली; परंतु त्यांना यश मिळाले नाही. पुढे महाडिक २०१४ ला, तर मंडलिक २०१९ ला खासदार झाले. आता महाडिक राज्यसभेचे खासदार आहेत; तर मंडलिक नव्याने लोकसभेच्या रिंगणात आहेत.

दोन्हींकडे गुलाल नाही

राजकीय क्षेत्रात काम केले, समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला; परंतु तरीही जनतेने विधानसभा व लोकसभेलाही गुलाल लावला नाही, असेही अनेकांच्या बाबतीत घडले. त्यामध्ये ‘शेतकरी कामगार पक्षाची मुलुखमैदान तोफ’ अशी प्रतिमा असलेले प्रा. विष्णुपंत इंगवले, विजय देवणे, शिवसेनेचे पुंडलिक जाधव यांचा समावेश होतो.

राजू शेट्टी २००४ मध्ये झाले आमदार

गायकवाड १९७८ च्या निवडणुकीतही आमदार होते. कल्लाप्पाण्णा आवाडे हे १९८०च्या निवडणुकीत अर्स काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. शिरोळ मतदारसंघातून २००४च्या निवडणुकीत राजू शेट्टी अपक्ष म्हणून आमदार झाले होते.

Web Title: Uday Singhrao Gaikwad, Sadashivrao Mandalik, Kallappanna Awade and Raju Shetty became MPs after becoming MLA In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.