Kolhapur LokSabha Constituency: साक्षात परमेश्वर आला तरी मंडलिकांचा पराभव शक्य नाही - मंत्री हसन मुश्रीफ
By विश्वास पाटील | Published: April 5, 2024 07:28 PM2024-04-05T19:28:22+5:302024-04-05T19:29:48+5:30
मी सहा वेळा विधानसभेच्या मांडवाखालून गेलो आहे. आता सातव्यांदाही तुम्ही माझ्यावर अक्षता टाकणार आहात. परमेश्वर व जनता आपल्यामागे आहे.
सेनापती कापशी : कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत कागल तालुक्यातील महायुतीतील तीन गट एकत्र येऊन जर मताधिक्य मिळवले तर साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही, असा ठाम विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी रात्री येथे हुतात्मा चौकात झालेल्या प्रचारसभेत व्यक्त केला. विधानसभेचे राजकारण लोकसभेवेळी काढून मंडलिक यांची अडचण करू नका, असा इशाराही त्यांनी भाजपच्या तालुक्यातील गटाला दिला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना अन् समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट एकत्र आला आहे. माझी तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपण एकत्रित येऊन जर मताधिक्य मिळवले तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वर आला तरी मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही.
तिन्ही गटांचे कार्यकर्ते, नेते, समजूतदार आहेत. त्यामुळे कुणी त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा परिणाम मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल, असे वक्तव्य आणि कृती करू नये. आम्ही आता तुम्हाला मदत करणार आहोत. तुम्ही आमचे विधानसभेला काय करणार असे त्यांनी म्हणायचे मग यांनी काय करायचे या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. बोलण्यातून, कृतीतून काही चुकीच्या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत जाता कामा नयेत, असेही मंत्री मुश्रीफ यांनी बजावले.
संजय मंडलिक म्हणाले, सदाशिवराव मंडलिक व मंत्री मुश्रीफ यांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात चिकोत्रा खोऱ्यातील जनता नेहमीच पाठीशी राहिली आहे. ही परंपरा याही वेळी अबाधित राहणार यात माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
शशिकांत खोत म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे संजय मंडलिक यांना दहा हत्तींचे बळ मिळाले आहे. या परिसरातून मोठे मताधिक्य देण्यात सिंहाचा वाटा असेल.
सूर्याजी घोरपडे म्हणाले, मुश्रीफ व मंडलिक गट एकत्र आल्याने संजय मंडलिक हे विक्रमी मताधिक्याने निवडून येणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.
यावेळी अलका साळवी, मारुती चोथे, धनाजी काटे, सूर्यकांत भोसले, दिलीप शिंदे, परशराम शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. सरपंच उज्ज्वला कांबळे यांनी स्वागत केले. प्रवीण नायकवडे यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच सौरभ नाईक यांनी आभार मानले.
यावेळी भैय्या माने, अंकुश पाटील, जोती मुसळे, रावसाहेब फराकटे, प्रदीप चव्हाण, अप्पासाहेब तांबेकर, रामचंद्र सांगले, धनाजी काटे, आर.एस. पाटील आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातव्यांदा अक्षता..
आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. विधानसभेला भाजपही इच्छुक आहे. मी सहा वेळा विधानसभेच्या मांडवाखालून गेलो आहे. आता सातव्यांदाही तुम्ही माझ्यावर अक्षता टाकणार आहात. परमेश्वर व जनता आपल्यामागे आहे. त्यावेळी काय होईल ते होईल, परंतु मंडलिक यांची आता अडचण होईल असे कुणीच काही करू नका, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कागलच्या मेळाव्याचे पडसाद..
कागलमध्ये भाजपचा समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ एप्रिलला जाहीर मेळावा झाला. त्यामध्ये घाटगे यांनी पटत नसले तरी काही लोकांच्या सोबत आपली छायाचित्रे प्रसिद्ध होणार आहेत. गट म्हणून त्यांच्यासोबत जावे लागणार आहे हे खरे असले तरी कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. आपले मिशन ठरलेले आहे. घोषणा देण्याची संधी ऑक्टोबरमध्ये देणार असल्याचे सांगून घाटगे यांनी विधानसभा लढवणार असल्याचेच जाहीर केले आहे. त्याचेच पडसाद या मेळाव्यात उमटले.