शाहू छत्रपतींविषयी पुन्हा बोलण्याचे धाडस नको, सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 03:59 PM2024-04-22T15:59:37+5:302024-04-22T16:01:20+5:30

मंडलिक यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव वीरेंद्र यांनी केलेल्या शाहू महाराजांविषयीच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचे नेते संतप्त

Do not dare to talk about Shahu Chhatrapati again, Satej Patil warns the Sanjay Mandalik | शाहू छत्रपतींविषयी पुन्हा बोलण्याचे धाडस नको, सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा

शाहू छत्रपतींविषयी पुन्हा बोलण्याचे धाडस नको, सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा

कोल्हापूर : मी अजूनही ‘त्यांना’ सूचना करतोय. मी विनंती करणार नाही. माझा त्यांच्यावर हक्क आहे. तुम्ही पुन्हा शाहू छत्रपती यांच्याविषयी बोलायचे धाडस करू नका, असा खरमरीत इशारा आमदार सतेज पाटील यांनी रविवारी संजय मंडलिक यांना दिला आहे. मंडलिक यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव वीरेंद्र यांनी केलेल्या शाहू महाराजांविषयीच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले आहेत. मिरजकर तिकटीवरील सभेत याचे पडसाद उमटले.

शाहू महाराज थेट वारसदार नाहीत असा आरोप संजय मंडलिक यांनी केला होता, तर शाहू महाराजांच्यानंतर या घराण्याकडून फारसे काही काम झाले नसल्याची टीका त्यांचे चिरंजीव वीरेंद्र यांनी केली होती. याला उत्तर देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापूर शहरात प्रचार करताना हाच मुद्दा समोर ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या वक्तव्यांना त्याच आक्रमक पद्धतीने प्रत्यु्त्तर देताना ‘महाविकास’चे नेते आक्रमक झाले आहेत.

आमदार सतेज पाटील म्हणाले, एवढे होते तर गेल्यावेळी मग शाहू छत्रपतींचा आशीर्वाद घ्यायला वाड्यावर का गेला होता. उमेदवारी मिळवण्यासाठी सैरावैरा पळायची वेळ आली. ती जाहीर व्हायला महिनाभर लागलाय. उमेदवारीचा तुम्हाला विश्वास नव्हता तर तुम्ही जनतेचा विश्वास काय मिळविणार? शाहू छत्रपती म्हणाले, धार्मिक ध्रुवीकरणामध्ये माणसातील दरी वाढविण्याचे काम सुरू आहे. या पुढच्या काळात निवडणुकाच होतील की नाही अशी शंका आहे. शहरात थेट पाइपलाइनचे पाणी नीटपणे फिरवले गेले पाहिजे.

यावेळी आमदार जयश्री जाधव, सुनील मोदी, राजेंद्र ठोंबरे, राजू लाटकर, प्रा. टी. एस. पाटील, आर. के. पोवार, सतीशचंद्र कांबळे, दयानंद कांबळे, हर्षल सुर्वे यांची भाषणे झाली. यावेळी मालोजीराजे छत्रपती यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मंडलिकांनी कारखाना विकला

महाविकास आघाडीच्या वतीने मंडलिक यांना लक्ष्य करताना भारती पोवार यांनी खळबळजनक आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, ज्या सदाशिवराव मंडलिक यांच्या नावाने साखर कारखाना काढला आहे, तो कारखाना कर्नाटकातल्या एका नेत्याला विकून टाकला आहे.

गादीविरोधात बोलाल तर छाताडावर बसू

मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक म्हणाले, छत्रपतींच्यावर कोणतीही टीका सहन करणार नाही. जर कोल्हापूरच्या गादीला नावं ठेवली तर छाताडावर बसू.

Web Title: Do not dare to talk about Shahu Chhatrapati again, Satej Patil warns the Sanjay Mandalik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.