निवडणूक प्रशिक्षणासाठी ‘रविवार’च बरा, विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र!

By अमित महाबळ | Published: March 21, 2024 08:19 PM2024-03-21T20:19:37+5:302024-03-21T20:19:37+5:30

परीक्षाही सुरळीत पार पडण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

sunday is better for election training university letter to colleges | निवडणूक प्रशिक्षणासाठी ‘रविवार’च बरा, विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र!

निवडणूक प्रशिक्षणासाठी ‘रविवार’च बरा, विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र!

अमित महाबळ, जळगाव : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि लोकसभा निवडणूक एकत्र आली आहे. निवडणुकांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी घेतले जाणार असून, त्यांचे निवडणूक पूर्व प्रशिक्षण वर्ग रविवारी घेतले जावेत, अशी विनंती तहसीलदारांना करण्यास महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे. यामुळे परीक्षाही सुरळीत पार पडण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा दि. ४ एप्रिलपासून, तर पदव्युत्तरची परीक्षा दि. २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. मे अखेरपर्यंत या परीक्षा चालतील. या दरम्यान, दि. १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव व रावेर आणि दि. २० मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. निवडणूक कामासाठी महाविद्यालये व विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा घेतल्या जाणार आहेत. त्यांचे प्रशिक्षणवर्गही होणार आहेत. तसे पत्र विद्यापीठाला प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यापीठातील अडीचशे शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी हे निवडणूक ड्युटीवर होते. याशिवाय संलग्न महाविद्यालयांकडील मनुष्यबळाची संख्या वेगळी होती.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निवडणुकीचे प्रशिक्षण आणि निवडणूक ड्युटी या सर्वांचा एकत्रित परिणाम हा परीक्षा कामकाजावर होऊ नये याची काळजी विद्यापीठाला घ्यावी लागत आहे. त्या दृष्टीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी महाविद्यालये व संस्थांना पत्र पाठवून तहसीलदारांशी संपर्क साधून निवडणुकीचे प्रशिक्षणवर्ग हे रविवारी घेण्याची विनंती करावी. यामुळे विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरळीत पार पाडणे शक्य होईल, असे कळवले आहे.

म्हणून परीक्षा होणार नाहीत...

निवडणुकीमुळे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दि. ११, १३, १४ मे आणि दि. १८, २० व २१ मे रोजी विद्यापीठाच्या कुठल्याही परीक्षा होणार नाहीत. निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची पूर्वतयारी, त्यांनी एक दिवस आधी मतदान केंद्रस्थळी पोहोचणे, दुसऱ्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य परत प्रशासनाकडे जमा करणे या सर्वांचा विचार करून सहा दिवस परीक्षा न घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे, अशी माहिती कुलसचिवांनी दिली.

Web Title: sunday is better for election training university letter to colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.