नवाजुद्दीन सिद्दीकी कायद्याच्या कचाट्यात, पत्नीचे कॉल रेकॉर्ड मागवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 09:22 PM2018-03-09T21:22:40+5:302018-03-10T02:33:57+5:30

नवाजुद्दीन यांचा मध्यंतरी पत्नी अंजलीसोबत कौटुंबिक वाद सुरू होता.

The charge of Nawazuddin Siddiqui law has asked for his wife's call record | नवाजुद्दीन सिद्दीकी कायद्याच्या कचाट्यात, पत्नीचे कॉल रेकॉर्ड मागवल्याचा आरोप

नवाजुद्दीन सिद्दीकी कायद्याच्या कचाट्यात, पत्नीचे कॉल रेकॉर्ड मागवल्याचा आरोप

googlenewsNext

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची लवकरच होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांच्यासह आणखी तिघांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे.   मोबाइल फोन्सचे सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवणा-या आरोपींचे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी महिन्यात उघडकीस आणले. देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित, काही खासगी गुप्तहेर आणि यवतमाळच्या एका पोलीस कर्मचा-यासह ११ आरोपींना पोलिसांनी या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक केली.

या प्रकरणातील आरोपींकडून काही दिग्गज नेते आणि सेलिब्रिटींनीही बेकायदेशीररित्या सीडीआर मिळवल्याचा आरोप पोलिसांनी सुरूवातीलाच केला होता. यामध्ये आता नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात नवाजुद्दीन यांची भूमिका नेमकी कशी होती, याची चौकशीही पोलिसांनी केली. पोलिसांनी अटक केलेल्या ११ आरोपींमध्ये कोपरखैरणे येथील प्रशांत पालेकर याचा समावेश होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन यांचा मध्यंतरी पत्नी अंजलीसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. त्यावेळी पत्नीचे कॉल डिटेल्स तपासण्यासाठी त्यांचे वकिल रिझवान सिद्दीकी यांनी प्रशांत पालेकर याच्याकडून सीडीआर विकत घेतल्याची माहिती तपासामध्ये समोर आली. आरोपीच्या जबाबामध्ये ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दीकी, त्यांची पत्नी अंजली आणि अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यानुसार नवाजुद्दीन शुक्रवारी ठाणे पोलिसांकडे चौकशीसाठी येण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात ते चौकशीसाठी आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नवाजुद्दीन यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांचे वकिल रिझवान सिद्दीकी यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यांच्या कार्यालयाच्या दूरध्वनीकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी, त्यांची पत्नी अंजली आणि त्यांचे वकिल रिझवान सिद्दीकी यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींच्या जबाबातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांची चौकशी केली जाणार आहे. तिघांची या प्रकरणातील नेमकी भूमिका चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.
- अभिषेक त्रिमुखे
पोलीस उपायुक्त (गुन्हे)
ठाणे
 

Web Title: The charge of Nawazuddin Siddiqui law has asked for his wife's call record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.