'सिंघम'साठी रोहित शेट्टीच्या ऑफिसमधून फोन आला अन्... सुचित्रा बांदेकरांनी सांगितला मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 06:38 PM2024-03-19T18:38:00+5:302024-03-19T18:39:21+5:30
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, 'मी त्याला म्हणलं बरं बरं सांगते आणि...'
मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा अभिनय नेहमी पाहण्यासारखाच असतो. त्यांच्या अभिनयाची, आवाजाची एक वेगळीच शैली आहे. सुचित्रा बांदेकर यांची 'सिंघम' (Singham) मधील भूमिका तर प्रत्येकाच्याच लक्षात असेल. तर सिंघमसाठी त्यांची निवड कशी झाली याचा इंटरेस्टिंग किस्सा त्यांनी नुकताच सांगितला. तसंच सिंघम नंतर रोहित शेट्टीच्याच (Rohit Shetty) 'सिंबा','इंडियन पोलिस फोर्स' मध्येही त्या झळकल्या.
'दिल के करीब' या युट्यूब चॅनलवर संवाद साधताना सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "मला एका व्यक्तीचा फोन आला होता. त्यांनी मला सुचित्रा बांदेकर बोलत आहात का असं विचारलं. मग तो म्हणाला मी रोहित शेट्टीच्या प्रोडक्शनमधून बोलतोय. तुम्हाला एका सिनेमात कास्ट करायचं आहे. मी त्याला म्हणलं बरं बरं सांगते आणि मी फोन ठेवला. कारण मला तो द रोहित शेट्टी आहे हे त्याक्षणी सुचलंच नाही. थोड्यावेळाने पुन्हा त्याचा फोन आला आणि तो म्हणाला तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? यावर मी त्याला विचारलं रोहित शेट्टी म्हणजे गोलमाल सिनेमा बनवणारा का? तर तो म्हणाला हो."
त्या पुढे म्हणाल्या,"यानंतर मी रोहित शेट्टीच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा माझी भेट त्यांच्याशी झाली. ते म्हणाले, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात तुमचं काम पाहिलं आहे. मला तुम्हाला सिंघम मध्ये घेण्याची इच्छा आहे. माझ्यासोबत सचिन खेडेकरही होता. रोहितला सचिन आणि माझी शिवाजीराजे सिनेमातली केमिस्ट्री आवडली होती. त्याला असंच काहीतरी सिंघममध्ये अपेक्षित होतं म्हणून त्याने आम्हाला दोघांनाच ऑफर दिली. मी सुद्धा मग सिनेमासाठी होकार दिला."