What is this love? | हे कसलं प्रेम?

- चंद्रकांत कित्तुरे
एका तरुणावरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी दोन मैत्रिणींनी विष घेतले. जी जगेल तिचा तो तरुण, अशी यामागची कल्पना होती. यात एकीने जीव गमावला, हे कशाचे लक्षण...
प्रेम हे आंधळं असतं, असं म्हणतात. ते काही प्रमाणात खरंही असतं. एकमेकांसाठी जिवाला जीव द्यायला तयार होणं, त्याच्या अगर तिच्यासाठी कोणतेही कष्ट उपसण्याचीे, कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तयारी दाखवणं, समाजाचा, कुटुंबाचा विरोध पत्करून हे प्रेम निभावणं याला खरं प्रेम म्हणतात; पण एकाच तरुणावर दोन बालमैत्रिणींचं प्रेम जडणं, त्याच्यावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी दोघींनीही विष घेणं आणि त्यात एकीनं जीव गमावणं हे कसलं प्रेम? त्याग म्हणायचा, ईर्षा म्हणायची, की कशाचं अंधानुकरण म्हणायचं?
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ही घटना आहे. दोन बालमैत्रिणी एकाच तरुणाच्या प्रेमात पडल्या आणि त्याच्यावरील खरं प्रेम कुणाचं हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी उंदराला मारण्याचे औषध चॉकलेटमधून खाल्ले. यातून जी जगेल तिचा तो प्रियकर, असे त्यांचे ठरले होते. या घटनेत एकीचा मृत्यू झाला आहे. हे असे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी कसा काय घेतला? विष घेतल्यानंतर दोघींचाही जीव जाईल असे त्यांना वाटले नसेल का? त्या प्रियकराला हे माहीत होते का? त्याचे प्रेम कुणावर होते? असे अनेक प्रश्न या घटनेतून उपस्थित होत आहेत. या दोघींनी विष घेण्याची ही कल्पना मराठी दूरचित्रवाणीवरील एक मालिका पाहून उचलली असल्याचा संशय आहे. ते खरे असेल तर याला अंधानुकरण म्हणावे लागेल. युवा पिढी प्रेमात कशी वाहवत चालली आहे, याचा हा एक नमुना म्हणावा लागेल. कोणतीही मालिका, चित्रपट अथवा नाटक सुरू करण्यापूर्वी त्याचे कथानक हे काल्पनिक आहे, त्याचा वास्तवातील घटनांशी संबंध नाही, कुणीही त्याचे अनुकरण करू नये, असा इशारावजा फलक झळकावला जातो किंवा सांगितले जाते. तरीही अनेक जण अशा चित्रपट किंवा मालिकांतील प्रसंगांचे किंवा व्यक्तिरेखांचे अनुकरण करू पाहतात. ही अनुकरणप्रियता लहान मुले आणि युवावर्गातही अधिक दिसते. त्यातूनच असे टोकाचे उपाय किंवा निर्णय घेतले जातात. समाजासाठी ही बाब अतिशय चिंताजनक आहे.
आपली मुले काय करतात? त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? यावर पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रेम हे जात-पात, गरीब-श्रीमंत पाहत नाही. ते कुणावरही जडू शकतं. युवावस्थेत तारुण्यसुलभ भावना, होत जाणारे शारीरिक बदल, यासारख्या कारणांतून परलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटू लागते. त्यातूनच प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात; पण जसे वय वाढेल, तसे एकमेकांच्या आवडी-निवडी किंवा अन्य कारणांवरून खटके उडू लागतात. आपलं प्रेम हे केवळ शारीरिक आकर्षण असल्याचे जाणवू लागते. यातूनच ब्रेक-अप होते. याचे अलीकडच्या काळात चित्रपट, मालिकांमधून अधिकच उदात्तीकरण केले जात आहे. यातूनच तरुण पिढीत बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड नसणं हे मागासलेपणाचं लक्षण समजले जाते आहे. समाजाला, कुटुंबीयांना आपलं हे प्रेम मान्य होईल का? त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार ही प्रेमीयुगुले करीत नाहीत. त्यातून आत्महत्येसारखे प्रकार घडतात. एखाद्या गोष्टीचे किती अंधानुकरण करावे, त्यात किती वाहवत जावे, याचा निर्णय घ्यायला युवा वर्गाने शिकले पाहिजे. पालकांनी, जाणत्या लोकांनी हे त्यांना समजावले पाहिजे, तरच अशा घटना टाळता येतील.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.